घरमहाराष्ट्रबिल्डर आणि पालिका मुख्याधिकार्‍याविरोधात गुन्हा

बिल्डर आणि पालिका मुख्याधिकार्‍याविरोधात गुन्हा

Subscribe

*17 जण ढिगार्‍याखाली
*चार वर्षाच्या मोहंमदची सुखरूप सुटका
*15 जणांचा देवदूत प्रमोद शिर्वे

ऐन गणेशोत्सवात महाडमध्ये मृत्यूचे तांडव ठरलेल्या ताहीर गार्डन या इमारतीच्या दुर्घटनेला कारण ठरलेल्या विकासकासह पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्यासह पाच जणांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांच्या अटकेसाठी पोलिसांचे विशेष पथक ते राहत असलेल्या ठिकाणी रवाना झाले आहेत. सोमवारी संध्याकाळी महाड शहरांतील काजळपुरा परिसरातील ताहीर गार्डन ही इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि सार्‍या महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटले. ढिगार्‍याखालून आतापर्यंत १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर ढिगार्‍यातून बाहेर काढण्यात आलेल्यांपैकी पंधराजणांना विविध इस्पितळांमध्ये रवाना करण्यात आले आहे. चारजण बेपत्ता आहेत. ७८ जण बचावले आहेत.

- Advertisement -

या दुर्घटनेप्रकरणी पालिकेचे अधिकारी, बिल्डर यांच्यासह पाचजणांविरोधात सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ढिगार्‍याखाली अडकलेल्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफच्या तीन तुकड्या घटनास्थळी अविरत काम करत आहेत, शिवाय प्रशासनासह खाजगी उद्योगांनी दिलेल्या यंत्रणेच्या सहाय्याने मदतकार्य जोमाने सुरू झाले आहे.

महाड इमारत दुर्घटनेमध्ये दोषी असलेल्या बिल्डरवर कडक कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अनिल पारसकर यांनी दिल्यानंतर पालिकेचे ज्युनिअर इंजिनिअर सुहास कांबळे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात दुर्घटनेला जबाबदार असलेल्या पाचजणांच्या विरोधात तक्रार दाखल केली. महाड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्यावर इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देताना हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. याशिवाय इमारतीचा विकासक फारुक काझी(तळोजा), श्रावणी कन्सल्टंटचे बाहूबली टी धमाने(सल्लागार), आरेखक गौरव शहा यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पालिकेचे त्यावेळचे ज्युनिअर इंजिनिअर शशिकांत दिघे यांनी इमारतीला रहिवासी दाखला देताना इमारतीची योग्य तपासणी केली नसल्याचा आरोप ठेवण्यात आला असून या सर्वांवर दंडविधान 304, 304अ, 337 व 338, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे विषेश पथक या आरोपींच्या अटकेसाठी ते राहत असलेल्या ठिकाणी रवाना करण्यात आले असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेश सणस यांनी दिली.

- Advertisement -

सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला ताहिर गार्डन ही दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली इमारत अचानक कोसळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले, धुळीचे लोट पसरले, इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच त्या परिसरातील काही जागरुक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली. एनडीआरएफच्या तीन पथकांद्वारे ढिगारे उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या इमारतीत 41 सदनिका, एक कार्यालय, एक जीम आणि एक मोकळा हॉल होता. इमारतीच्या ए विंगमध्ये 21 सदनिका असून, यात राहात असलेल्या व्यक्तींची संख्या 54 असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यातील 41 व्यक्तींना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. इमारतीच्या ढिगार्‍याखाली आणखी 13 जण अडकल्याची भीती व्यक्त होते. बी विंग मध्ये 20 सदनिका असून या सदनिकांमध्ये 43 जण राहत होते. दुर्घटना घडल्यानंतर इमारतीतील 37 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असले तरी ढिगार्‍याखाली आणखी सहाजण अडकल्याची शक्यता आहे. या इमारतीच्या दोन विंगमध्ये 97 व्यक्ती राहात होत्या. त्यापैकी 78 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. तर 19 जण ढिगार्‍यात अडकले असल्याची माहिती महसूल विभागाने दिली. जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. या इस्पितळात नमिरा शौकत मसुरकर, संतोष सहानी, दीपक कुमार, स्वप्नील प्रमोद शिर्वे, नवीद हमिद दुष्टे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चार वर्षीय बांगीचे दैव बलवत्त
या दुर्घटनेत ढिगार्‍याखाली अडकलेल्या चार वर्षीय मोहंमद नदीन बांगी या चार वर्षांच्या लहानग्याचे दैव बलवत्तर होते. ढिगार्‍या खालून अम्मा, अब्बा असे एका लहान मुलाचे आवाज येत असल्याचे शोधकार्य करणार्‍यांना ऐकू येताच एनडीआरएफच्या जवानांनी आवाजाच्या दिशेने शोधकार्य सुरू केले. अत्यंत गतीने पण तितक्याच सावधपणे दूर केलेल्या ढिगार्‍यात मोहंमद नदीम बांगी रडत असल्याचे लक्षात आले. जवानांनी त्याला चक्क 18 तासांनी सुखरूप बाहेर काढले. केवळ दैव बलवत्तर असल्यानेच त्याला जीवदान मिळाल्याची भावना उपस्थितांमध्ये होती. मात्र या दुर्घटनेत त्याची आई आणि बहीण मात्र अजून सापडलेली नाही. त्याचे वडील दुबई येथे कामाला आहेत.

ढिगार्‍यातून काढण्यात आलेले मृतदेह
सय्यद हमिद समीर,
नविद झमाणे,
नौसिन नदीम बांगी,
अदी हसिन शेखनाग,
रोशनबी देशमुख,
फातीमा अन्सारी,
इसतम हसिम शेखनाग,
अल्ल तिमस बल्लारी,
शौकत आदम अलसुलकर

जखमींची नावेः-
नामिरा शौकत मसुरकर (१९), फरिदा रियाज पोरे, नवीद हमीद दुस्ते (३२), महमद बांगी (4), स्वप्निल प्रमोद शिर्के (२४), जयप्रकाश कुमार, संतोष सहानी, दीपक कुमार. जखमींवर शहरातील ग्रामीण आणि इतर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगार्‍याखाली आणखी 16जण असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ढिगारा काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून मंगळवारी उशिरापर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

इमारतीचे ढिगारे काढण्यासाठी अनेक संस्थांनी तात्काळ मदतीचे हात पुढे केले. यात साळुंके ग्रुप, महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप, ठाणे डिझास्टर मॅनेजमेंट फोर्स, कोल्हापुर रेस्क्यु टीम या स्वयंसेवी संस्थांनी मोलाचे सहकार्य केले. याशिवाय स्थानिक तरुणांचा सहभागदेखील महत्वाचा ठरला आहे.

15 जणांचा देवदूत प्रमोद शिर्वे
या दुर्घटनेचा साक्षीदार काजळपुरा परिसरांतील युवक स्वप्नील प्रमोद शिर्वे हा अनेकांचा देवदूत ठरला. त्याला इमारतीचा भाग कोसळत असल्याचे लक्षात आल्यावर त्वरीत हालचाल केली. त्याने इमारतीतील पंधराहून अधिकजणांना बाहेर काढण्यात यश मिळविले. स्वप्निलने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने पंधराजणांचे प्राण वाचवता आले. यात तो स्वत: जखमी झाला असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. त्याने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दुर्घटनेनंतर हजारो हात मदतीसाठी पुढे आले. महामार्गाचे काम करीत असलेल्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने आपली अवजड यंत्रणा ढिगारे काढण्यासाठी तात्काळ रवाना केली. जे नागरिक जखमी झाले त्यांना रक्ताची निकड लक्षात घेता महाड येथील जनकल्याण रक्त पेढीने तात्काळ रक्तदानाचे आवाहन केले. या आवाहनाला तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला. अवघ्या चार तासात 64 तरुणांनी रक्तदान केले.

पहाटे दुर्घटनाग्रस्त इमारतीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यांनी परिसराची पहाणी केली. परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी प्रशासनाला वेगाने मदत कार्य करण्याच्या सुचना दिल्या. दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांविरोधात तात्काळ कारवाईच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, महाडचे आमदार भरत गोगावले, महाडच्या नगराध्यक्षा श्रीमती स्नेहल जगताप, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, पोलीस अधीक्षक डॉ अनिल पारसकर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ भरत शितोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ रात्रभर महाडमध्ये घटनास्थळी तळ ठोकून होते.

मृतांच्या वारसदारांना 5 लाख,जखमींना 50 हजारांची मदत
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी 4 लाख रुपये व मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 1 लाख रुपये याप्रमाणे 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. या दुर्घटनेत किमान 22 कुटुंबांची घरे उध्वस्त झालेली असल्याने त्यांना भरीव मदत मिळण्यासाठी बुधवारी होणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करणार येणार आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -