… म्हणून उद्धव ठाकरेंनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, सुहास कांदेंचा गौप्यस्फोट

suhas kande and uddhav thackeray
सुहास कांदे आणि उद्धव ठाकरे

नाशिक – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल मालेगावात तुफान सभा झाली. या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे शिंदे गटावर निशाणा साधला. तसंच, नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदेवर यांच्यावरही टीकास्त्र डागलं. त्यांच्या या टीकेला सुहास कांदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीआधीच राजीनामा का दिला असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात विचारण्यात आला होता. या प्रश्नावरून वकिलांनी युक्तीवाद करताना उत्तरे दिलीही. परंतु, या प्रश्नाचं वेगळंच उत्तर आमदार सुहास कांदे यांनी दिलं आहे. त्यांचं उत्तर म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मोठा गौप्यस्फोट ठरणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या राजीनामा प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयात बरीच खलबते झाली. सर्वोच्च न्यायालयाने राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच, बहुमत चाचणीवरून राज्यपालांच्या भूमिकेवरही बोट ठेवलं होतं. परंतु, राज्यपालांवर ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ठाकरे गटाच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते. असे असतानाच सुहास कांदे यांनी वेगळाच गौप्यस्फोट केला आहे.

उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना वाचवण्याकरता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला असल्याचं सुहास कांदे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला. किती लोकांना फोन केले, किती लोकांना मध्यस्त केलं, राजीनामा देण्यापूर्वी मी स्वतः साक्षीदार आहे. या काँट्रॅक्टरकडून आपण किती खोके घेतले याची देखील चौकशी करा, असा पलटवार सुहास कांदे यांनी केला. हे दावे सिद्ध करण्याकरता ठाकरेंची नार्को टेस्ट घेण्याचंही आवाहन सुहास कांदे यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“तुम्ही म्हणता कांद्याला भाव मिळाला, मी म्हणतो, कांद्याला भाव मिळाला. गेल्यावर्षी एका कांद्याला भाव मिळाला. एक कांदा 50 खोक्याला विकला गेला”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी मालेगावात काल केली होती.

सुहास कांदेंचं प्रत्युत्तर काय?

खोक्यांवरून माझी नार्को टेस्ट करा. मी ज्या काँट्रॅक्टरांची नावे सांगतो त्यांची पण नार्को टेस्ट करा. म्हैसकर, आयआरबी कंपनी आणि तुमची पण नार्को टेस्ट करा. उद्धव ठाकरेंनी पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला. किती लोकांना फोन केले, किती लोकांन मध्यस्त केलं, राजीनामा देण्यापूर्वी मी स्वतः साक्षीदार आहे. या काँट्रॅक्टरकडून आपण किती खोके घेतले याची देखील चौकशी करा, असा पलटवार सुहास कांदे यांनी केला. ठाकरेंची सभा फक्त टोमण्यांची सभा होती. या सभेत तरुणांना कोणतंही नेतृत्त्व नव्हतं. तसेच तरुणांना, शेतकऱ्यांना दिशा देणारी सभा नव्हती. सभा पाहून बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मला उद्धव ठाकरेंची दया आली.” असंही कांदे म्हणाले. तसंच, पाटणकरांसाठी ठाकरेंनी राजीनामा दिला नसेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असंही सुहास कांदे म्हणाले.