ठाण्यातील तीन हात नाक्याजवळ विचित्र अपघात; डंपरच्या क्लिनरचा मृत्यू, तर चालक जखमी

नाशिक- मुंबई मागमार्गावरील तीन हात नाका उड्डाणपुलाजवळ झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात डंपर क्लिनर समीर शेख (२०,रा.कमलानगर, वडाळा)याचा मृत्यू झाला असून डंपर चालक अहमद हुसेन (२५ ) हा जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. हायड्रा मशीनच्या साह्याने व आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचाऱ्यांच्या मदतीने अपघातग्रस्त डंपर आणि २० टन माती असलेला ट्रक रोडच्या बाजूला करण्यात आले. तसेच अपघातामुळे रोडवरती पडलेल्या ऑईलवर माती टाकून नाशिक-मुंबई महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. यावेळी तुरळक वाहतुक कोंडी झाली होती. हा विचित्र अपघात अर्जंट ब्रेक दाबल्याने झाला असून ज्या वाहन चालकाने अर्जंट ब्रेक मारला तो तेथून निघून गेला. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नाशिककडून मुंबईकडे जाणारा रोडवरती तिनहात नाका ब्रिज जवळ, एका अनोळखी वाहनाने अर्जंट ब्रेक दाबला. यावेळी त्या वाहनाच्या मागून येणारा डंपर हा त्या वाहनाला मागून धडकला. त्यातच त्या डंपरचा मागून येणारा ट्रक हा त्या डंपरवर जाऊन धडकला अशाप्रकारे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या घटनेत डंपरमधील चालक आणि क्लिनर हे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या दोघांना तातडीने ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी नेले. यावेळी तेथील डॉक्टरांनी क्लिनर समीर याला मृत घोषीत केले. तर चालक हुसेन याच्या डाव्या पायाला व डाव्या हाताला दुखापत झाल्याने, त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले आहे.

तर ज्या अनोळखी वाहनाने अर्जंट ब्रेक दाबला आणि हा अपघात झाला ते वाहन तेथून निघून गेल्याने त्याची माहिती समजू शकली नाही. तर डंपर हा जीलानी मुव्हर्स कंपनीच्या मालकीचा असून त्यामध्ये कोणतेही साहित्य नसल्याने तो रिकामा होता. तसेच डंपरला धडकणारा ट्रक हा सुनील शिंदे याच्या मालकीचा असून त्यावरील चालक सोमनाथ भोसले हा गुजरातवरून कोल्हापूरला २०- टन माती घेऊन जात होता. त्या अपघातग्रस्त दोन वाहनांना रस्त्याच्या एका बाजूला करून तो रस्त्या सर्व वाहनांसाठी मोकळा करण्यात आला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.


हेही वाचा : Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी, राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मोठा निर्णय