घरमहाराष्ट्रसंजय राऊत यांच्याभोवती ईडीचा फास; ईडीच्या कारवाईविरोधात आघाडीत संताप

संजय राऊत यांच्याभोवती ईडीचा फास; ईडीच्या कारवाईविरोधात आघाडीत संताप

Subscribe

१ हजार ३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा संजय राऊत यांनी अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे.

मुंबई : भाजपचे शीर्षस्थ नेते आणि केंद्रीय तपास यंत्रणावर सातत्याने चौफेर टीका करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मंगळवारी अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाईचा फास आवळला आहे. ईडीने आज  संजय राऊत यांच्या मुंबईतील दादर येथील राहत्या घरासह पालघर आणि अलिबागमधील आठ भूखंड जप्त करण्यात आले. ईडीच्या या कारवाईचे तीव्र पडसाद महाविकास आघाडीत उमटले असून, ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका केली आहे.

मुंबईतील गोरेगाव येथील १ हजार ३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा संजय राऊत यांनी अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. गावकऱ्यांना धमकावून कमी पैशात जमीन खरेदी केल्याचा राऊत यांच्यावर आरोप आहे. त्यानुसार राऊत यांच्यावर आजची कारवाई झाल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत एकूण ११ कोटी १५ लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफ डागली. कुठली प्रॉपर्टी? आम्ही काय प्रॉपर्टीवाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर आहे. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. अशा गैरव्यवहारातील एक रुपया जरी आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपला दान करायला तयार आहोत, असे राऊत म्हणाले.

राजकीय सूड आणि बदल्यासाठीच हा प्रकार सुरू आहे. कोणत्या थराला हे लोक जातात हे तुम्ही पाहात आहात. भाजपचे दोन-चार नाचे आज कारवाईनंतर नाचत आहेत. भाजपच्या लोकांना आनंद झाला आहे, आनंदाने उड्या मारत आहोत. फटाके फोडत आहेत. मराठी माणसाचे हक्काचे घर जप्त केल्याबद्दल आनंद आहे, असेच करत राहिले  पाहिजे. यातून लढण्याची प्रेरणा मिळते, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. ईडीने जप्त केलेली जमीन एक एकरही नसेल. आमच्या नातेवाईकांनी अधिकृत पैशांतून या जमिनी खरेदी केल्या होत्या. यामध्येही ईडीला आता आर्थिक गैरव्यवहार दिसायला लागला आहे. सूडबुद्धीतूनच ही सगळी कारवाई होत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हे दबावाचे राजकारण

“आपल्याला सरळ सरळ दिसत आहे हे सर्व राजकीय हेतूने होत आहे. कुठे ना कुठे तरी बदल्याची भावना घेऊन हे होत आहे.  आपल्या देशात जे काही चालले आहे ते लोकशाहीचे वातावरण नाही. हे राजकीय वातावरण नाही हे दबावाचे राजकारण चालले आहे”
आदित्य ठाकरे
शिवसेना नेते

“संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त करण्याअगोदर त्यांना कल्पना देणे आवश्यक होते.  मात्र संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सगळ्याचा सरकारवर परीणाम होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सरकार आणि  सरकारमधील संबंधित लोकांना बदनाम करण्यासाठी या यंत्रणा वापरल्या जात आहेत”
जयंत पाटील
प्रदेशाध्यक्ष,  राष्ट्रवादी कॉंग्रेस

” संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईने भाजपला आनंद व्हायचे  कारण नाही.  राऊत यांना नेहमीच मोदीसाहेब यांच्यापासून भाजपच्या नेत्यांवर  टीका करताना आनंदाच्या उकळ्या कशा फुटायच्या त्याची त्यांनी आठवण करावी. भाजपला काही उडया मारायचे कारण नाही. कारण हा विषय भाजपचा नाही तर एका तपास यंत्रणेचा आहे”
प्रवीण दरेकर
विरोधी पक्षनेते, विधान परिषद

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -