घरक्राइमभायखळ्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांवरील 'तो' हल्ला पूर्ववैमनस्यातून! पोलीस तपासात उघड

भायखळ्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांवरील ‘तो’ हल्ला पूर्ववैमनस्यातून! पोलीस तपासात उघड

Subscribe

मुंबई : राज्यातील राजकारण सध्या शिवसेना केंद्रीत झाले आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे राज्यात एखादी घटना घडली की, त्याला राजकीय रंग चढवला जात आहे. भायखळा येथे अलीकडेच शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्याच्याबाबतीतही विविध प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

भायखळा शिवसेना उपविभागप्रमुख विजय कामतेकर आणि विधानसभा समन्वयक बबन गावकर हे १४ जुलै रोजी रात्री माझगाव परिसरात स्विफ्ट कारमधून जात असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कामतेकर व गावकर यांच्या गाडीवर रॉडने हल्ला केला. गाडीची तोडफोड आणि शिवीगाळ करून हे हल्लेखोर पसार झाले, असा आरोप कामतेकर यांनी केला होता. कामतेकर आणि गावकर हे दोघेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे मानले जातात.

- Advertisement -

या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथील रामभाऊ भोगले मार्गावरील २०८ नंबरच्या शाखेला भेट दिली आणि कामतेकर तसेच गावकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज्य सरकारवर या हल्ल्याची चौकशी करावी. शिवसैनिकांना रक्त न सांडण्याचे आवाहन मी केले आहे. मात्र असे जीवाशी येत असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री याची जबाबदारी घेणार का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला होता. या हल्ल्यामागे एकनाथ शिंदे समर्थक आमदार यामिनी यशवंत जाधव आणि शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांचा हात असल्याचा ठाकरे समर्थक सेनेचा आरोप होता.

तथापि, हा हल्ला हा पूर्ववैमनस्यातूनच झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. तशी कबुली देखील आरोपींनी दिली आहे. या हल्ल्याला राजकीय रंग मिळेल आणि आपल्यावर कुणाचा संशय येणार नाही, असा आरोपींचा विचार होता. या हल्ल्यामागे आर्थिक व्यवहार हे देखील कारणीभूत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांनी सागर विजय साव आणि आनंद ऊर्फ अन्या अशोक काळे यांना २ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -