घरमहाराष्ट्र‘सीएम चषक’ स्पर्धेसाठी भाजपकडून मोर्चेबांधणी

‘सीएम चषक’ स्पर्धेसाठी भाजपकडून मोर्चेबांधणी

Subscribe

भाजप संपूर्ण राज्यात पुढील लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टीने तरुणाईची मतांची मोट बांधून त्यांना आकर्षित करण्याचा आणि मोदी सरकारच्या योजना तळागाळात रुजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

संपूर्ण राज्यात भाजपतर्फे सध्या सी. एम. चषकाची तयारी सुरू आहे. १ नोव्हेंबर पासून १६ वर्षाच्या वयोगटातील तरुण, तरुणी तसेच ज्येष्ठांसाठी यात स्पर्धा असणार आहेत. निवडणुका जसजशा जवळ आल्या आहेत, तशा सर्व पक्षीयांच्या नागरिकांना भुलवणाऱ्या स्पर्धा आणि कार्यक्रम सुरूच राहणार आहेत. राज्यभरात या स्पर्धा सुरू राहणार असल्या तरी नवी मुंबईने यात आघाडी घेतली आहे. मात्र यातून भाजप संपूर्ण राज्यात पुढील लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टीने तरुणाईची मतांची मोट बांधून त्यांना आकर्षित करण्याचा आणि मोदी सरकारच्या योजना तळागाळात रुजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

भाजपने क्रिडा स्पर्धांचा आधार घेतला

नवी मुंबईत बेलापूर आणि ऐरोली ही दोन विधानसभा क्षेत्रे असली तरी आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल आणि जे. एन .पी. टी.च्यामुळे उरण हे मतदारसंघही भाजपच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे. काही महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. त्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका एकत्र होण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने काही महिनेच सध्या मोदी आणि फडणवीस सरकारकडे उरले आहेत. त्यात देशात मुंबईमुळे महाराष्ट्र राज्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष स्वप्न पाहत असतो. तब्बल एक तपानंतर भाजप आणि शिवसेनेला पुन्हा सत्तेचे लोणी चाखण्यास मिळाले आहे. त्यामुळे पुढील सत्तेत येण्यासाठी स्वच्छ चेहरा असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसलेली दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील काळात नव मतदार तयार होत असताना त्यांना आपल्या सरकारने केलेल्या कामाची माहिती व्हावी, किंबहुना त्यांच्यावर बिंबवण्यासाठी भाजपने क्रीडास्पर्धांचा आधार घेतला आहे.

- Advertisement -

नागरिकांवर भडिमार होण्याची शक्यता

या क्रीडा स्पर्धांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची नावे देण्यात आली आहेत. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी शहरात जाहिरातबाजीने भाजपसारकरने सुरू केलेल्या योजनांचा नागरिकांवर भडिमार होण्याची शक्यता आहे. तरुण पिढी मतदानासाठी तयार होत असताना मतांचे राजकारण ओळखत अगदी विचारपूर्वक हा कार्यक्रम आखला गेला आहे. राज्यातील ५० लाख तरुण या स्पर्धेत सहभागी होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. याचा फायदा भाजपला नक्कीच होणार आहे. ज्या भागात भाजपचे आमदार नाहीत त्या भागात भाजप जास्त जोर देताना दिसत आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येत ६५ टक्के तरुण वर्ग आहे.

नवी मुंबई जास्त महत्त्वाची

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सध्या नवी मुंबईवर जास्तच प्रेम उतू जाताना दिसत आहे. भविष्यातील अती महत्वाचे शहर म्हणून मुंबईला ही मागे सोडणारे शहर म्हणून नावारूपास येणार आहे. हे ओळखत येथे भाजपची ताकत वाढवण्याचा कार्यक्रम आखला आहे. त्यात स्वतः मुख्यमंत्री २ वेळा नवी मुंबईत तर एकवेळ अंतरराष्ट्रिय विमानतळाच्या उदघातानाकरीत येऊन गेले आहेत. त्यात कधी नव्हे ते नवी मुंबईत सध्या भाजपचे २ आमदार आणि कॅबिनेट दर्जादिलेले खात्याचे अध्यक्ष शहरात आहेत. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना गोंजारून ए. पी. एम. सी. हातात ठेवून संपूर्ण राज्याच्या शेतकऱ्यांवर राज्य करण्याचा विचार यातून दिसून येतो. तर सिडको अध्यक्षपद प्रशांत ठाकुरांना देऊन नवी मुंबई, पनवेल आणि उरण येथील प्रकल्पग्रस्तांना इवलेसे करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यात आगरी कोळी समाजाचे नेते रमेश पाटील यांना विधान परिषद आमदारकी देऊन ठाणे आणि नवी मुंबईत आगरी कोळी समाजाला तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यातच पनवेलमध्ये वाढत्या शहरीकरणाने शेकपक्षाचा ओसारता प्रभाव भाजपच्या पथ्यावर आहे. तर उरणमध्ये सध्याच्या सेनेच्या आमदाराप्रति नागरिकांची नाराजी आहे. त्यामुळे तिथे महेश बालदिंच्या रुपात भाजपला आपले पाय रोवायचे आहेत. त्यामुळे या क्रीडा स्पर्धांचा चांगलाच फायदा तरुणांना आपलेसे करण्यात चारही मतदारसंघात भाजपला होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

स्पर्धेत विजयी खेळाडूंना जिल्हापातळीवर संधी

तरुणवर्गाला क्रीडा स्पर्धांत मुख्यमंत्र्यांच्या सहीचे प्रमाणपत्र म्हणजे आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर स्पर्धांत विजयी झालेल्या खेळाडूंना जिल्हापातळीवर खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या क्रीडा मोहत्सवात भाजपला आपल्या योजना तरुणांच्या आणि नागरिकांच्या तसेच ग्रामिण भागात रुजवता येणार आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या आणि क्रीडास्पर्धांच्या अडून भाजप इतर पक्षांच्या एक पाऊल पुढे निघून गेल्याचे सध्या तरी दृश्य दिसत आहे.


हेही वाचा – क्रिडापटूंनी आम्हाला निधी द्यावा; हरयाणा सरकारचा अजब निर्णय

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -