घरमहाराष्ट्रआघाडीनेही घेतले होते 15 दिवस

आघाडीनेही घेतले होते 15 दिवस

Subscribe

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही पंधरा दिवसांपर्यंत सरकार स्थापन करण्याबाबत भाजप व शिवसेनेत चर्चाही सुरू होऊ शकली नाही. यामुळे महाराष्ट्रात निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्याबाबत झालेला हा उशीर पहिल्यांदाच होत असल्याची चर्चा आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीनेही मतमोजणीनंतर सरकार स्थापन करण्यासाठी २००४ व २००९ मध्ये अनुक्रमे १५ व १६ दिवस घेतले होते.

महाराष्ट्रात १९९५ पासून निवडणूकपूर्व युती करून सत्तेत येण्याचा नवा पायंडा पडला. त्यानंतर १९९९मध्ये काँग्रेस व नव्याने स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवडणुकीनंतर एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते. २००४ व २००९ मध्ये दोन्ही काँग्रेसने निवडणूकपूर्व आघाडी करून एकत्र सत्ता स्थापन केली होती. मात्र, या दोन्हीही वेळी निवडणूकपूर्व आघाडी करूनही सरकार स्थापन करण्यास पंधरा दिवसांपेक्षा अधिक वेळ घेतल्याचे दिसून आले आहे. २००९च्या निवडणुकीनंतर तर लवकरात लवकर सरकार स्थापन करावे, असे दोन्ही पक्षांना सांगण्याची वेळ तत्कालीन राज्यपाल जमीर यांच्यावर आली होती.

- Advertisement -

२००४ मध्ये १३ ऑक्टोबरला मतदान होऊन १६ ऑक्टोबरला निकाल जाहीर झाले होते. त्यात काँग्रसचे ६९ व राष्ट्रवादी काँग्रेसचे ७१ आमदार निवडून आले होते. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार अधिक असूनही काँग्रेसने राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला होता. मात्र, त्या बदल्यास राष्ट्रवादीला अधिक मंत्रिपदे हवी होती. ती खाती कोणती असावित याबाबत दोन्ही पक्षांमधे एकमत होत नव्हते. त्यामुळे सरकार स्थापन करण्याची चर्चा पुढे जात नव्हती. महाराष्ट्रात निकालानंतर सरकार स्थापन करण्यासाठी सर्वात जास्त वेळ लागण्याची ती पहिलीच वेळ होती. त्यामुळे तो चर्चेचा मोठा विषय झाला होता. अखेर त्यांच्यात एकमत होऊन १ नोव्हेंबर २००४ ला विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

२००९मध्येही १३ ऑक्टोबरलाच मतदान झाले होते. मतमोजणी २२ ऑक्टोबरला होऊन त्यात काँग्रेसने ८२ व राष्ट्रवादी काँग्रेसने ६२ जागा जिंकल्या होत्या. तेव्हाही सरकार स्थापन करताना काँग्रेसने २००४ मध्ये राष्ट्रवादीला दिलेली जादा खाती न देण्याची भूमिका घेऊन २००९ मध्ये ठरलेले खाते वाटपाचे सूत्र पुन्हा वापरण्याचा निर्णय घेतला. मात्र, राष्ट्रवादीची त्यासाठी तयारी नसल्यामुळे नवीन सरकार स्थापन करण्यात अडचणी येत होत्या. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर असल्याने तोपर्यंत सरकार स्थापन होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता, पण या दोन्ही पक्षांकडून काहीही निर्णय होत नव्हता. अखेर तत्कालीन राज्यपाल जमीर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे नेते अनुक्रमे अशोक चव्हाण व छगन भुजबळ यांना पत्र पाठवून लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणजे ९ नोव्हेंबर २००९ रोजी अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

- Advertisement -

१६ दिवसांनंतरही अपयश
२०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवूनही निकालानंतर फारच कमी वेळात म्हणजे ऑक्टोबरमध्येच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यावेळी शिवसेना व भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवूनही १५ दिवसांत सत्ता स्थापन करण्यासाठी कुणीही चर्चा केली नाही. तसेच पंधराव्या दिवशी हे दोन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करू शकत नसल्याने मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता हा तिढा किती दिवसांत संपणार हे पुढील काळातच दिसून येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -