घरमहाराष्ट्रभिवंडी शहरालगत २० ते २५ गावांचा संपर्क तुटला

भिवंडी शहरालगत २० ते २५ गावांचा संपर्क तुटला

Subscribe

पावसामुळे अनेक लोकांचे हाल झाले आहेत.

भिवंडी शहरात आणि तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे भिवंडी शहरा सोबतच तालुक्यातील असंख्य गावांना झोडपून काढले आहे. महानगरपालिका सीमेवरील कामवारी नदीचे पाणी वाढल्याने नजिकच्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील नदीनाका परीसरातील रफीक कंपाऊंड येथील शेकडो घरांमध्ये सुमारे चार ते पाच फुट पाणी शिरले आहे. यामुळे येथील नागरीक हवालदील झाले आहे. ग्रामपंचायत आणि तहसीलदार प्रशासनाने त्यांना कोणतीही आपत्कालीन मदत दिली नाही. यामुळे या भागातील लोकांना पाणी असलेल्या घरात जिव मुठीत धरुन पलंगावर रात्र काढण्याची वेळ आली होती. भिवंडी शहरातील असंख्य सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. मंडई, तिनबत्ती भाजी मार्केट, निजामपुरा, पदमानगर, जैतुनपुरा, मंगलबजार स्लॅब, कमला हॉटेल, कामतघर, बाला कंपाऊंड, ईदगाह याठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुकानांसह घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर, नदीनाका येथील रफीक कंपाऊंड येथील घरांमध्ये पाणी शिरले आहे.

भिवंडीत गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यात पाणीच पाणी झाले आहे . भिवंडी-परोळ रोडवरील कांबा गावच्या हद्दीत रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने २० ते २५ गावचा संपर्क तुटला आहे. यामुळे बहुसंख्य नागरीक अडकून पडले आहेत. कांबा, जुनांदूखी, टेंभवली, गाणे, फिरिंगपाडा,लखीवली, पालीवली,माजीवडा, धामणे ,चिंबीपाडा,कुहे ,खडकी , आंबराई, भुईशेत आदी गावांचा यात समावेश आहे. मुसळधार पावसामुळे खाडीचे पाणी परिसरात शिरल्याने शेत जमिनीत पाणीच पाणी झाले आहे. शेतकऱ्यांनी बांधलेले बांधारे सुद्धा वाहून गेले आहे. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी नागरिक हवालदील झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -