नाशिक : ‘नवीन हिटलरशाही – शेतकर्यांचे मरण’ टोमॅटोचे भाव पाडून झाल्यावर कांद्याचे भाव पाडण्यासाठी केलेल्या तातडीच्या प्रयत्नांबद्दल मोदी सरकारचे तमाम शेतकर्यांच्या वतीने जाहीर आभार.. असे उपरोधिक आभार व्यक्त करत नाशिकच्या शेतकर्याने व्यंगचित्राच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या ही पोस्ट सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे.
सटाणा तालुक्यातील तरुण शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी हे व्यंगचित्र रेखाटून शेतकर्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यांनी साकारलेल्या व्यंग चित्रात कांदा उत्पादक शेतकरी प्रगतीची वाटचाल करत असतांना त्याच्या पायात बेडी अडकवून त्या बेडीची साखळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे ओढत असल्याचे व्यंगचित्र रेखाटले आहे. व्यंगचित्रकार मोरे यांनी काढलेले हे व्यंग चित्र सध्या शेतकरी संघटनांच्या सोशल प्लॅटफॉर्मवर चांगलेच व्हायरल होत आहे. या व्यंगचित्राबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावलेली एक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
कांदा व्यापार्यांनी लिलाव बंद केल्याने आवक घटली
कांदा व्यापार्यांनी लिलाव बंद केल्यामुळे जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमध्ये हजारो क्विंटल कांद्याचे व्यवहार थांबले आहेत. या निर्णयाची माहिती नसल्याने जिथे सकाळी शेतकरी माल घेऊन आले, त्या नाशिक येथील शरदचंद्र पवार मार्केट यार्डासह अन्य काही समितींत लिलाव झाले. केंद्र सरकारने कांद्यावर अकस्मात निर्यात शुल्क लागू करताना स्पष्टता केली नसल्याने परदेशात जाणारा माल बांग्लादेश सीमा व बंदरात अडकून पडला आहे. या निषेधार्थ सोमवारपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचे जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने जाहीर केले होते. त्याचे परिणाम पहिल्याच दिवशी घाऊक बाजारात दिसून आले. काहींना या निर्णयाची कल्पना नव्हती. त्यामुळे शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथे काही शेतकरी टेम्पोत कांदा घेऊन आले होते. लिलावाअभावी त्यांना माल परत नेण्याची वेळ येऊ नये म्हणून व्यापार्यांनी संबंधितांच्या मालाचे लिलाव केले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सुमारे ६ हजार क्विंटल कांद्याची आवक होते.
हेही वाचा :
- कांदा पेटला, सरकार हादरले ?
- …दोन चार महिने कांदा नाही खाल्ला तरी बिघडत नाही; दादा भुसेंच्या सल्ल्याने नवा वादंग