घर उत्तर महाराष्ट्र कांदा पेटलेलाच ! लिलाव पाडले बंद, शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग केला ३ तास...

कांदा पेटलेलाच ! लिलाव पाडले बंद, शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग केला ३ तास ठप्प

Subscribe

नाशिक : शनिवारी (दि. १९) केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागणाऱ्या शुल्कात तब्बल 40 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी संतप्त झाल्याचे बघायला मिळाले होते. राज्यभरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केली जात होती. तसेच, नाशिक जिल्ह्यात सर्व प्रमुख 15 बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय शेतकरी व व्यापाऱ्यांनी घेतला होता. दरम्यान बुधवारी (दि. २३) केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या मध्यस्तीने आजपासून लिलाव पूर्वपदावर आले होते. मात्र अवघ्या काही तासात कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत मुंबई – आग्रा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.

राज्यभरत शेतकरी आक्रमक झाल्याने राज्य सरकारही हादरले. राज्य सरकारने तात्काळ पाऊल उचलली आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली गाठत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जपानमधून या विषयात लक्ष घातलं. शेतकऱ्यांचा हा आक्रोश बघून केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून दोन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र त्यावरही शेतकरी समाधानी नसल्याचा बघायला मिळालं होतं.

- Advertisement -

दरम्यान, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी बुधवारी (दि. २३) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेत जिल्हाभरातील कांद्याचे लिलाव सुरू करण्याची विनंती केली. तसेच निर्यात शुल्क बाबत देखील केंद्रात पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आज पासून नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव सुरू करण्यात आला. मात्र सकाळी कांदा लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला मिळत असलेल्या अल्प दरामुळे शेतकरी पुन्हा एकदा संतप्त झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड, पिंपळगाव यांसह इतर बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला. मुंबई – आग्रा महामार्गावरील पिंपळगाव आणि चांदवड या ठिकाणी शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले.

अचानक हजारोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर आल्याने पोलीस प्रशासनाचे देखील तारांबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ मोठा फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला मात्र संतप्त असलेल्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत आम्हाला चांगला भाव मिळत नाही तसेच वाढीव निर्यात शुल्क मागे घेतली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा पवित्र घेतला. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या सगळ्या प्रकरणामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाल्याचं बघायला मिळाल.

- Advertisement -

दरम्यान, रास्ता रोको आंदोलन करत असलेले शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे सरते शेवटी पोलीस प्रशासनाने सौम्य बाळाचा वापर करत रस्त्यावरील शेतकऱ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकरी व पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे ही बघायला मिळाल. बाजार समित्या पुन्हा सुरू झाल्यानंतर राज्यात आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यात निर्माण झालेला कांदा प्रश्न कुठेतरी शमेल असे वाटत असतानाच शेतकऱ्यांनी पुन्हा बाजारपेठा बंद पाडल्याने आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्याने या प्रश्नाला वेगळे वळण मिळाल्याचे बघायला मिळत आहे.

- Advertisment -