पारंपरिक ज्ञानाच्या जतन, प्रसारात स्थानिक महिलांची भूमिका महत्वाची

नाशिक : आदिवासी दिन हा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात साजरा केला जातो. या वर्षी जागतिक आदिवासी दिनाची संकल्पना,‘ पारंपरिक ज्ञानाच्या जतन आणि प्रसारात आदिवासी महिलांची भूमिका’ ही आहे. या संकल्पनेनुसार आजचा आदिवासी दिन सर्वत्र साजरा होणार आहे. याच दिवशी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनाही ठिकठिकाणी अभिवादन करण्यात येणार आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजात तब्बल 50 वर्षे वाटचाल करताना जी बाब समोर आली ती धक्कादायक अशी होती. जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणार्‍या मूळ निवासी समुहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले. परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या होत्या. या मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी International Day of Indigenous People अर्थात विश्व आदिवासी दिवस घोषित केला. त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने या जमातींच्या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देणे याला सुरुवात झाली. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने आदिवासींचे दैवत क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ ९ ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘आदिवासी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेेतला. जंगलाचे म्हणजेच वनसंपदेचे रक्षण करून पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या कामी वनवासींचे मोठे योगदान आहे.

‘मोडेल पण वाकणार नाही’ हा बाणा त्यांनी पिढ्यान् पिढ्या जपला आहे. हाता-पोटावर काम करून जगणारी ही जमात आहे. त्यांच्याकडे इतर काही उपजिविकेचे साधन नसल्याने ते आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर काही प्रमाणात आजही पिछाडीवर असल्याने निदर्शनास येते. जागतिक पातळीवर ही जमात विभिन्न नावांनी ओळखली जाते. या पार्श्वभूमीवर त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास होऊन त्यांचे जीवन सर्व दृष्टीने समृद्ध व्हावे, या उद्देशाने युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेतर्फे ९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदाचा आदिवासी दिन हा या समाजाच्या महिलांना समर्पित असा आहे. या दिवसाच्या संकल्पनेनुसार, आदिवासींची संस्कृती अतिशय समृद्ध अशी आहे. आदिवासींमधील कौशल्य आणि अंगभूत गुणांमुळे ही संस्कृती अजूनही टिकून आहे. या पारंपारिक ज्ञानाचा प्रसार पुढच्या पिढीपर्यंत झाला तर या समाजाची संस्कृती अव्याहतपणे पुढे पाझरत राहिल. या दृष्टीने आदिवासी महिलांची भूमिका महत्वाची आहे.