रक्तदान मोहिमेसाठी आता ‘फेसबुक’चा वापर

रक्तदानाचे प्रमाण वाढावे यासाठी समाज माध्यमांचा वापर करण्याचे पाऊल राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) उचलले आहे. त्याअनुषंगाने आता एसबीटीसीने फेसबुकचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

the state blood transfusion council will now use facebook for blood donation campaign
रक्तदान मोहिमेसाठी आता फेसबुकचा वापर

कोरोनाच्या काळात राज्यात जाणवणाऱ्या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. रक्तदानाचे प्रमाण वाढावे यासाठी समाज माध्यमांचा वापर करण्याचे पाऊल राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) उचलले आहे. त्याअनुषंगाने आता एसबीटीसीने फेसबुकचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात राज्यातील रक्तसाठा कमी होत होता. गर्दी टाळणे आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी रक्तदान शिबीरांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन झाले नाही. काही ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत रक्तदान शिबीरे घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. आता लॉकडाऊन शिथील केले आहे. कोरोनाबरोबरच अन्य आजारांतील गरजू रुग्णांच्या उपचारात ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना ते वेळेवर मिळावे यासाठी सामाजिक संस्थांच्या रक्तदान शिबीरासोबतच फेसबुकच्या रक्तदान टूल या सेवेची मदत घेण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

या उपक्रमात राज्यभरातील सुमारे ७१ शासकीय रक्तपेढ्यांची फेसबुकच्या रक्तदान मोहिमेच्या व्यासपीठावर नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर एखाद्या रक्तपेढीला रक्ताची गरज भासली तर ती पेढी फेसबुकच्या पेजवर तशी मागणी करेल. त्यानंतर फेसबुकमार्फत संबंधीत रक्तपेढीच्या विभागातील, शहरातील रक्तदात्यांना रक्तदानाबाबत संदेश दिला जाईल आणि कुठल्या रक्तपेढीत जाऊन कुठल्या गटाचे रक्त द्यायचे याची माहिती दिली जाईल. त्यामुळे वेळीच आवश्यक त्या गटाचे रक्त उपलब्ध झाल्यावर रुग्णाचे प्राण वाचू शकतात. फेसबुक सारख्या समाज माध्यमाचा वापर रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमासाठी झाल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.

दरम्यान, आज जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातल्या रक्तदात्यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रात स्वयंस्फूर्तीने रक्तदानाचे प्रमाण देशात सर्वाधिक असून रक्तसंकलनात महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा – धक्कादायक! रुग्णांच्या किंकाळ्या आणि अस्वस्थ करणारी दृश्य; गोदावरी मेडिकलमधील प्रकार