घरमहाराष्ट्र१२ आमदारांच्या नियुक्तीसाठी ठाकरेंकडून धमकी; माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा आरोप

१२ आमदारांच्या नियुक्तीसाठी ठाकरेंकडून धमकी; माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा आरोप

Subscribe

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त १२ जागांसाठी नावे पाठवूनही भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त होईपर्यंत या नावांना मंजुरी दिली नाही. दरम्यानच्या काळात हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यावर भाष्य करूनही कोश्यारी यांनी या यादीवर स्वाक्षरी केली नाही. याबद्दल भगतसिंह कोश्यारी यांनी पहिल्यांदाच जाहीर मत व्यक्त केले आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत कोश्यारी यांनी मविआने ही यादी मंजूर करण्यासाठी धमकावल्याचा आरोप केला आहे.

कोश्यारी म्हणाले की, महाविकास आघाडीने मला यासंदर्भात ५ पानांचे पत्र दिले होते. या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत आहात. कायदे सांगत आहात आणि शेवटी लिहिता की १५ दिवसांत यादी मंजूर करा. कुठे लिहिले आहे की मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतो की इतक्या दिवसांच्या आत यादी मंजूर करून पाठवा. संविधानात कुठे लिहिले आहे? मला निर्णय घेण्यासाठी मुदत कशी दिली जाऊ शकते. तुम्ही विनंती करायला हवी. हे पत्र जेव्हा समोर येईल तेव्हा तुम्हाला कळेल की सत्य काय आहे. तसे पत्र पाठवले नसते तर मी पुढच्याच दिवशी त्यावर सही करणार होतो, असे म्हणत कोश्यारी यांनी संताप व्यक्त केला.

- Advertisement -

तसेच विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रियाही चुकीची होती. मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांपेक्षा मोठे नाहीत. तेव्हाही मला धमकी देणारे पत्र लिहिण्यात आले. नवीन सरकार आले तेव्हा त्यांनी व्यवस्थित पत्र दिले. म्हणूनच नवीन अध्यक्षांची निवड तात्काळ केली, असा खुलासा कोश्यारी यांनी केला.

महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा प्रस्ताव आदित्य ठाकरे घेऊन आले होते. ते सारखे फोन करायचे. मी त्यांना विचारले अरे, तुमचा नवरदेव कुठे आहे. त्याला आधी आणा. उद्या त्याने मुख्यमंत्री होण्यास नकार दिला तर. तरीही उद्धव ठाकरे पुढे आले नाहीत. मी त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांना सांगितले की, हे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे यांनी पुढे यायला हवे. पटेलही बोलले हे चुकीचेच आहे. विचारा छगन भुजबळ व अन्य नेत्यांना हे सत्य आहे की नाही. तीन तासांनी उद्धव ठाकरे समोर आले. यावर कोणीच काही बोलत नाही, असे कोश्यारी यांनी सांगितले.

- Advertisement -

कोरोना काळात मंदिरे उघडण्याबाबत कोश्यारी यांनी राज्य शासनाला पत्र लिहिले होते. हिंदुत्व विसरलात का, असा सवाल त्या पत्रात करण्यात आला होता. हे पत्र कोणाच्या दबावाखाली लिहिण्यात आले होते का, असा प्रश्न कोश्यारी यांना विचारण्यात आला. त्यावर कोश्यारी म्हणाले की, मी कोणाच्याही दबावाखाली ते पत्र लिहिले नव्हते.

उद्धव शकुनीच्या नादाला लागले
उद्धव ठाकरे हे संत आहेत. ते सरळ मार्गाने चालणारे आहेत, परंतु ते शकुनीच्या चक्रात अडकले आहेत, असे त्यांचीच माणसे मला येऊन सांगायची. ते शरद पवार यांच्यासारखे तरबेज राजकारणी नाहीत, असा दावाही भगतसिंह कोश्यारी यांनी केला.

शरद पवारांचा खुलासा राजकीय
देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी शरद पवार यांना माहीत होता, मात्र शरद पवार हे मान्य करीत नाहीत, यावर कोश्यारी म्हणाले की, शरद पवार हे आता राजकीय उत्तर देत आहेत. त्यावर मला बोलायचे नाही, पण त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात लवासा प्रकरण दाखल झाले होते. तेव्हा न्यायालय काय म्हणाले याचा जरा विचार शरद पवार यांनी करायला हवा. तो शपथविधी एका रात्रीत झालेला नाही. अजित पवार आले होते. ते बडे नेते आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवला म्हणून सरकार स्थापनेला होकार दिला. नंतर ते अल्पमतात गेले. त्यांनी राजीनामा दिला. त्यात वेगळे असे काही नाही. भूकंप होतो आणि सर्व एका रात्रीत उद्ध्वस्त होते. मग या शपथविधीवर एवढे आश्चर्य का, असा सवालही कोश्यारी यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -