घरमहाराष्ट्रयुतीच्या घोषणेसाठी १ ऑक्टोबरचा मुहूर्त

युतीच्या घोषणेसाठी १ ऑक्टोबरचा मुहूर्त

Subscribe

२९ सप्टेंबरला मोदी भारतात आल्यावर युतीवर शिक्कामोर्तब ,जागावाटप ः भाजप १४४, शिवसेना १२६, मित्रपक्ष १८,मुंबईत अमित शहा आणि उद्धव ठाकरे करणार घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युतीची घोषणा कधी होणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पितृपक्ष संपल्यानंतर २९ सप्टेंबरला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी युतीची घोषणा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना आता १ ऑक्टोबरच्या मुहूर्तावर ‘युती झाली हो…’, असे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी मुंबईत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करतील असेही सांगण्यात आल

पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ सप्टेंबरला मायदेशी परतणार आहेत. तेव्हा अमित शहा युतीचा अंतिम फॉर्म्युला त्यांच्यासमोर ठेवतील. एकदा मोदी यांनी यादीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर युतीच्या घोषणेचा मार्ग मोकळे होणार आहे. मात्र, नवरात्रीतील नऊ दिवस शुभ असले तरी १ ऑक्टोबर हा सर्वात शुभ असल्याने युतीच्या घोषणेसाठी या दिवसाची निवड अंतिम झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे हे मंगळवारी आधी प्रभादेवी येथे जाऊन सिद्धीविनायकचे दर्शन घेतील आणि मग पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार आहेत, असे समजते. शुभ मुहूर्तासोबत कुठला दिवस मीडिया कव्हरेजच्यादृष्टीने फायदेशीर ठरू शकतो, याचाही अंदाज युतीची घोषणा करताना विचारात घेण्यात आला आहे.

- Advertisement -

बंडखोरी रोखण्याचे आव्हान
आणखी एक कारण यामागे सांगितले जात आहे ते बंडखोरीचे. भाजप आणि शिवसेनेत मोठ्या संख्येने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून नेते आणि आजी,माजी आमदारांनी प्रवेश केला आहे. या सर्वांना तसेच दोन्ही पक्षांच्या सध्याच्या आमदारांना आणि गेली पाच वर्षे काम करून उमेदवारीची तयारी करणारे, अशा सगळ्यांना तिकीट हवे आहे. यामुळे मोठी बंडखोरी होऊ शकते. याचा विचार करताना बंडखोरीला कमीतकमी वेळ मिळावा, यासाठी १ ऑक्टोबरचा पर्याय निवडण्यात आला आहे.

मुंबई, पुणेसह ठाणे आणि गुहागर अशा काही जागा वाटपावरून युतीची घोषणा रखडली, असे बोलले जात आहे. वादाच्या अशा १५ ते २० जागांचा तिढा सोडवण्यासाठी लोकसभेच्या पालघर पॅटर्नचा वापर करण्यात येणार आहे. राजेंद्र गावित हे उमेदवार भाजपचे, पण शिवसेनच्या तिकिटावर निवडून आले. तसा मार्ग वापरून तिढा सोडवण्यात येईल. जागा वाटपात भाजपला १44, शिवसेनेला १26 आणि मित्रपक्षांना १८ जागा देण्यात येणार आहेत. मित्रपक्षांच्या १८ जागांवरील काही उमेदवार हे भाजपचे कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढवणार आहेत, असे कळते.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीचा विचार करून भाजपने आतापर्यंत तीन सर्व्हे केले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अमित शहा आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील सर्व्हेत १४० जागा भाजपला मिळण्याचा अंदाज आहे. तर शिवसेना ८० जागांवर विजयी होऊ शकते, असा अंदाज आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -