घरमहाराष्ट्रखुशखबर....आता ग्रामीण भागातील मुलींना मिळणार १२ वी पर्यंत एसटीचा मोफत पास

खुशखबर….आता ग्रामीण भागातील मुलींना मिळणार १२ वी पर्यंत एसटीचा मोफत पास

Subscribe

ग्रामीण भागामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज महत्तवपूर्ण निर्णय घेतला आहे. १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत सवलत पास मिळणार आहे.

लालपरी…ग्रामीण भागात पोहोचणारी ही लालपरी.. मात्र आता या लालपरीतून प्रवास करणाऱ्या मुलींसाठी एक खुशखबर आहे. ग्रामीण भागातील १२ वी पर्यत शिक्षण घेणाऱ्या मुलींना आता लालापरीतून मोफत प्रवास करता येणार आहे. एसटी महामंडळाने मांडलेल्या या प्रस्तावास राज्य मंत्रीमडळाने मान्यता दिल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना १२ वी पर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले. आतापर्यंत ही सवलत १० वी पर्यंतच्या मुलींसाठी ही सवलत होती.

काय म्हणालेत दिवाकर रावते 

अहिल्याबाई होळकर या योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एस.टी.ने मोफत प्रवास सवलत लागू आहे, ही सवलत आता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींकरीता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही सवलत १०० टक्के इतकी आहे. या योजनेत १० वी पर्यंत १९.५४ लाख विद्यार्थिनी तसेच १२ वी पर्यंत २४ लाख विद्यार्थिनी लाभ घेणार आहेत. यास्तव वाढीव आर्थिक भार ४४ कोटी इतका असणार आहे असे देखील त्यांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच एसटीच्या प्रवास सवलत योजनेत पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आली –    

१. विद्यार्थी (तंत्र व व्यावसायिक शिक्षण) मासिक पास – १९८६ नंतर सुरु झालेले विविध तंत्र व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचा सवलत योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. ही सवलत ६६.६७% असेल. सध्या या योजनेचे ४४ लाख विद्यार्थी लाभार्थी आहेत. या निर्णयामुळे ५० लाखापेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेणार आहेत.

२. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत ही सध्या सर्वसाधारण आणि निम-आराम बसेसमध्ये ५०% सवलत लागू आहे. आता वातानुकुलित शिवशाही (आसनव्यवस्था) बसमध्येही ४५% सवलत लागू करण्यात येत आहे. प्रतिवर्षी कमाल ४००० कि.मी. अंतराची मर्यादा लागू केली असून वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरले जाणार आहे. या योजनेचे सध्या ७० लाख लाभार्थी आहेत.

- Advertisement -

३. क्षयरोगग्रस्त व कर्करोगग्रस्त व्यक्तींना देण्‍यात येणारी सवलत – वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे सर्वसाधारण बसने राज्यांतर्गत अमर्याद अंतरापर्यंत प्रवास करण्यासाठी ५०% पर्यंत सवलत लागू होती, ती सवलत आता ७५% करण्यात आली आहे. या योजनेतून ८४ हजार रुग्णांना सवलत मिळत आहे.

४. अधिस्विकृतीधारक पत्रकारांना प्रवास सवलत-     सध्या सर्वसाधारण व निमआराम बसमध्ये वर्षभर १०० टक्के प्रवास सवलत लागू आहे. आता वातानुकूलित शिवशाही (आसनी व शयनयान) बसेसमध्येही १०० टक्के सवलत लागू करण्यात आली. या योजनेचे सध्या २८०० लाभार्थी आहेत.

५. सिकलसेलग्रस्त, हीमोफीलीया आणि एचआयव्ही बाधित रुग्ण यांना १००% प्रवास सवलत देण्यात आली आहे.

६. सध्या १००% अपंग असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारास ५०% प्रवास सवलत आहे. आता रेल्वेप्रमाणे ६५% अपंगत्व असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारासही ५०% सवलत देण्यात आली आहे. या योजनेचे सध्या ८० लाख लाभार्थी आहेत.

७. कौशल्य सेतु अभियान :- ही नवीन योजना लागू करण्यात येत असून, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने माध्यमिक शालांत परिक्षा (इ. १० वी) मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या कौशल्य सेतू अभियान योजनेमध्ये १११ प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थान ते प्रशिक्षण केंद्र या प्रवासासाठी ६६.६७% टक्के प्रवास सवलत लागू करण्यात आली आहे. या योजनेचे सध्या २५ हजार लाभार्थी आहेत. पुढे हे एक लाख लाभार्थी होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -