अडीच महिन्यांपूर्वीचा ‘भ्रष्टाचारी’, आता झाला शिंदे गटाचे ‘भूषण’; सर्वांच्या भुवया उंचावल्या

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अष्टप्रधान मंडळातील शिलेदार, तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सावलीसारख्या फिरणारे शिवसेना नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी काल, सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र अडीच महिन्यांपूर्वी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, तेच आता शिंदे गटाचे ‘भूषण’ ठरल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनीच भूषण देसाई यांच्या कथित भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला होता. त्यावर विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले खरे, मात्र अडीच महिन्यांत अशी चौकशी समिती नेमलीच गेलेली नाही.

छत्रपती संभाजी महाराज नगरातील (औरंगाबाद) एमआयडीसी चिकलठाणा येथील उद्योगांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचे स्टेट्स बदलून त्याचा व्यावसायिक व निवासी कारणांसाठी वापर करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यातील बहुतांश भ्रष्टाचार राज्याचे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या कार्यकाळात सर्वाधिक झाला असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी 28 डिसेंबर 2022 रोजी पत्रकार परिषदेत केला होता.

हे सर्व घडवून आणण्यासाठी सुभाष देसाई यांचा मुलगा (भूषण देसाई) 2018मध्ये औरंगाबादला यायचा आणि शहरातील एका प्रसिद्ध बिल्डरच्या माध्यमातून एमआयडीसीतील भूखंडधारकांशी संगनमत करून स्टेटस बदलण्यासाठी प्लॉटमागे दोन कोटी रुपये घेऊन मुंबईला परतायचा, असाही आरोप खासदार जलील यांनी केला होता. तसेच, याप्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.

खासदार जलील यांच्या या आरोपाच्या दोनच दिवसांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करण्यात आला. गेल्या हिवाळी अधिवेशनात 29 डिसेंबर 2022 रोजी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर 3000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला होता. सुभाष देसाई हे आधीच्या फडणवीस सरकारच्या काळात तसेच नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योगमंत्री (जवळपास साडेसात वर्षे) होते. राज्यातील विविध ठिकाणी उद्योगांसाठी निश्‍चित केलेले 4.14 लाख चौरस मीटरचे भूखंड बेकायदेशीरपणे निवासी वापरात रूपांतरित करण्यात आले. त्यांचे मूल्य 3 हजार 109 कोटी रुपये असूनही या भूखंडांचा केवळ 168 कोटी रुपयांना सौदा करण्यात आला, असा आरोप भातखळकर यांनी विधानसभेत केला होता.

कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना मे 2021 ते जून 2021 या कालावधीत है सौदे झाले. या व्यवहारांमध्ये सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण यांचा सहभाग असून वांद्रे-कुर्ला संकुलातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भूषण देसाई यांनी उद्योगपतींच्या गाठीभेटी घेतल्या, असा दावा अतुल भातखळकर यांनी त्यावेळी केला. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि भूषण देसाई यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. त्यावर विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या सर्वप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून त्याचा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले.

संजय राऊत यांची कोपरखळी
हाच धागा पकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज, मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. शिंदे गट आधी बाप पळवत होता आणि आता मुलेही पळवायला लागले आहेत, अशी टीका त्यांनी केली. भूषण देसाई यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याच भूषण देसाईंची चौकशीचे आदेश दिले होते. आता याच चिरंजीवांना त्यांचे मुख्यमंत्री वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करून बसले आहेत. ही भाजपा वॉशिंग मशीनची कमाल आहे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये उड्या मारायच्यायत… – आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनीही अवघ्या दोन-तीन ओळीत भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून प्रतिक्रिया दिली. भूषण देसाई हे काही शिवसेनेत नव्हते. त्यामुळे त्यांचे जाणे, हा काही शिवसेनेला धक्का नाही. ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये उड्या मारायच्या आहेत, त्यांना मारु द्या, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. सुभाष देसाई हे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. खुद्द सुभाष देसाई यांनीही, शिवसेना, बाळासाहेब तसेच उद्धव ठाकरे आणि मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील, अशी ग्वाही दिली आहे.

देसाई पिता-पुत्रात कुरबूर आधीपासूनच?
सुभाष देसाई आणि भूषण देसाई यांच्यात आधीपासूनच कुरबूर सुरू होती, असे सांगण्यात येते. आठच दिवसांपूर्वी शिंदे गटातील प्रवेशाबद्दल भूषण यांनी सुभाष देसाईंबरोबर चर्चा केली होती. मात्र, यापेक्षाही कठीण परिस्थिती आली तरी, पक्षनिष्ठा बदलणे ठीक नाही, असा सबुरीचा सल्ला सुभाष देसाई यांनी पुत्र भूषण यांना दिल्याचे समजते. पण त्याचवेळी त्यांचा निर्णय शिंदेंबरोबर जाण्याचा झाला होता, असे सांगण्यात येते.

एकाच फळीतील दुसरे घर फुटले
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पहिल्या फळीतले शिवसैनिक खासदार गजानन कीर्तिकर यांनी नोव्हेंबर 2022 महिन्यात उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. पण त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी मात्र ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला. अवघ्या चार महिन्यांतच त्याच फळीतील सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण शिंदे गटात सामील झाला आहे. पण सुभाष देसाई यांनी उद्धव ठाकरेंबाबतच निष्ठा दाखवली आहे.