Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम संतापजनक! कौमार्य चाचणीत नापास झाल्याने नववधूला दिला घटस्फोट

संतापजनक! कौमार्य चाचणीत नापास झाल्याने नववधूला दिला घटस्फोट

Related Story

- Advertisement -

समाजात आजही कूप्रथा चालवल्या जात आहेत. त्यातील एक म्हणजे कौमार्य चाचणी. बेलगावमध्ये कौमार्य चाचणीत नापास झाल्याने दोन तरुणींचे झालेले लग्न मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरमधील कंजारभाट समाजातील दोन तरुणींचा विवाह बेळगावमधील दोन सख्ख्या भावांशी झाला होता. विवाह थाटामाटात झाला. परंतू लग्नाच्या पहिल्याच रात्री या दोन्ही तरुणींची कौमार्य चाचणी केल्याचे उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर या चाचणीत एक तरुणी नापास झाल्याचा दावा करुन झाडाची फांदी मोडून, जात-पंचायत भरवून जात पंचायतीने हा विवाह मोडीत काढला. या प्रकारामुळे कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभागातील लोकांकडून संताप व्यक्त होत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

कोल्हापुरातील कंजारभाट समाजातील एका धुणी भांडी करत घर सांभाळणाऱ्या एका महिलेने अंनिसकडे तक्रार केली. तक्रारीनंतर या समाजात जात पंचायतीच्या नावाने सुरू असलेल्या अन्यायाला वाचा फुटली. पतीच्या निधनानंतर तिने मोठ्या कष्टाने दोन मुलींना वाढवत त्यांना शिक्षण दिलं. २७ नोव्हेंबर २०२० रोजी दोन्ही मुलींची एकाच मांडवात लग्न झाली. दोन्ही मुली एकाच घरात दिल्या. बेळगाव येथे थाटामाटात लग्न झालं. जेवणाचे निमित्त करून दोघींना एका पाहुण्यांच्या घरी नेले आणि त्यांची कौमार्य चाचणी करण्यात आली. या चाचणीत एक मुलगी नापास झाल्याचा आरोप करत त्या दिवसापासून छळ केला जात होता. ‘तु आत्महत्या कर, नाही तर माहेरी निघून जा’ म्हणून तगादा सुरू झाला.

- Advertisement -

दोन बहिणींपैकी त्या मुलीचा नवरा हा सैन्यात आहे. मला तीन खून माफ आहेत, तू आत्महत्या कर नाही तर मीच तुला गोळ्या घालीन…अशी धमकी हा सैनिक पती तिला देत होता. सासूदेखील या छळात सहभागी. पाच दिवसानंतर दोघींना माहेरी पाठवले. नंतर मात्र त्यांनी त्यांना सासरी येण्यास मज्जाव केला. याचा न्याय निवाडा करण्यासाठी जात पंचायत बसली. सासू काही नातेवाईकांना घेऊन तेथे पोहोचली. जात पंचायतीने कौमार्य चाचणीत नापास झाल्याचा ठपका ठेवत काडीमोड घेण्याचा प्रस्ताव पुढे आणला. डमी नवरा उभा करून त्याने बाबळीची काडी मोडली. घटस्फोट दिला.

हा सगळा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी तरुणींना आणि त्यांच्या आईला विश्वासात घेऊन राजारामपुरी पोलीस ठाण्यात दोन्ही नवरदेवांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे यापैकी एक नवरदेव हा भारतीय सैन्य दलात असून, त्याने आपल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या दोन्ही तरुणी सध्या कोल्हापूरमध्येच वास्तव्याला आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -