Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई पालिकेच्या नियोजनाअभावी लसीचा तुटवडा - भाजप

पालिकेच्या नियोजनाअभावी लसीचा तुटवडा – भाजप

मुंबईत पुढील २ दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिका प्रशासनाने कोरोना लसीच्या साठ्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे मुंबईत काही ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत, असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. मुंबईत पुढील २ दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे पालिकेने केंद्र सरकारला जबाबदार ठरवले आहे. तर भाजपने पालिकेला दोषी ठरवले आहे. त्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या राजकारण सुरू झाले आहे. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे व प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी मुंबईतील लसीच्या तुटवड्याला पालिकेचा गलथानपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी मुंबईतील ३० लसीकरण केंद्रे लसीचा साठा संपल्याने बंद करण्यात आली आहेत.

पालिकेचे लसीकरणाबाबत योग्य नियोजन नसल्याने लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. मुंबईत लसीचा मोठा तुटवडा भासत आहे. मुंबईतील सायन रुग्णालयात, तसेच इतर अनेक लसीकरण केंद्रावर कोविड लसीकरण मध्येच थांबवण्याची वेळ आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून राज्याने केंद्राकडे लसीच्या साठ्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच, पालिकेनेही राज्याकडे लसीसाठी पाठपुरावा करावा, अशी सूचना प्रभाकर शिंदे यांनी यावेळी पालिकेला व राज्य सरकारला केली आहे.

- Advertisement -

लसीचा तुटवडा झाल्याने लसीकरणाचा दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे आवश्यक लसींची मागणी आगाऊ नोंदवणे आवश्यक असून लसीचा पुरेसा साठा मुंबई महापालिकेला उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने युद्धपातळीवर पाठपुरावा करावा, अशी विनंती भाजपतर्फे महापौर आणि आयुक्तांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

महापौरांनी पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून या लसीकरणाच्या तुटवड्याबाबत आवश्यक त्या सर्व स्तरावर पाठपुरावा करून मुंबईत कुठेही लसीकरण थांबणार नाही यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

- Advertisement -