घरमहाराष्ट्र...अन्यथा पुन्हा पूर्ण लॉकडाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

…अन्यथा पुन्हा पूर्ण लॉकडाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

Subscribe

केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरू राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही चिथावणी आणि आमिषास बळी पडून स्वत:च्या तसेच इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करून घेऊ नये, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कोरोना काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि इतर कार्यक्रम आयोजित करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकते, असा इशारा दिला.

कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून वागा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसर्‍या लाटेला आमंत्रण देणार नाही याची खबरदारी घ्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयटीपार्कमध्ये उभारण्यात आलेल्या लहान मुलांसाठीच्या कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

पहिल्या लाटेच्या शेवटी सणवार आले होते. पण आता दुसरी लाट ओसरता ओसरता सण-उत्सवांची सुरुवात होते आहे. त्यात आपण गेल्या पंधरा दिवसांपासून निर्बंध शिथिल केले आहेत. पण ही मोकळीक आपले दैनंदिन पोटापाण्याचे व्यवसाय सुरू राहावेत, अर्थचक्र थांबू नये म्हणून आहे. आपल्याला संसर्ग आणि मृत्यू दर आणखी कमी करायचा आहे,असे ठाकरे म्हणाले. लोकार्पण होत असलेल्या कोविड काळजी केंद्राविषयी समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, तिसर्‍या संभाव्य लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका जास्त असल्याने राज्य सरकारने लहान मुलांसाठी कोविड टास्क फोर्स स्थापन केला असून असा टास्क फोर्स स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. मुंबईत आधुनिक अशी जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून त्या माध्यमातून आपल्याला संसर्गाविषयी शास्त्रीयदृष्ठ्या व्यवस्थित आणि त्वरेने माहिती मिळत राहील.

कलिना विद्यापीठ आय.टी. पार्क येथे उभारण्यात आलेले लहान मुलांचे कोरोना काळजी केंद्र हे पाच हजार चौरस फुटांचे असून रुग्ण खाटांची संख्या ३० आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी प्रशस्त जागा आहे. हे केंद्र कोरोनाग्रस्त लहान मुलांना अलगीकरण आणि त्यांच्या उपचारासाठी तयार करण्यात आले आहे. याठिकाणी स्तनदा मातांना स्तनपानासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त मुलांसोबत पालकांनाही राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये ऑक्सिजनयुक्त अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे.

- Advertisement -

या कोरोना काळजी केंद्रात २४ तास स्वच्छता आणि सुरक्षितेसाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुलांवर महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील आणि खासगी रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत. केंद्रात लहान मुलांना दवाखान्यात आल्यासारखे वाटू नये आणि आनंददायी वातावरण असावे असा प्रयत्न करण्यात आला आहे. रंगीबिरंगी भिंती, वेगवेगळी खेळणी, कार्डबोर्डचे बेड्स, आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -