कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा पूरग्रस्तांना फ्रीजऐवजी शून्य ऊर्जा शीतकपाटाचा पर्याय

रायगड जिल्ह्यातील महाडसह अन्य तालुक्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये भाज्या, फळे, आणि अन्य अन्नपदार्थ टिकवून ठेवणारे फ्रीज पाण्यात बुडाले. पण घाबरू नका. दापोली कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी शून्य ऊर्जा शीतकपाट निर्मिती करून जोपर्यंत तुमचे फ्रीज दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत हा एक उत्तम पर्याय निर्माण करून दिला आहे. याची जनजागृती कृषी अभ्यासक्रमातील विद्यार्थी पूरग्रस्त भागात करत आहेत.

कोकणातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी कायम अग्रेसर आहे. या विद्यापीठातील बी.एस.सी., अ‍ॅग्रीच्या विद्यार्थ्यांनी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणार्‍या वस्तूंपासून संकल शून्य ऊर्जा शीतकपाट तयार केले आहे. विविध गावात महापुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे. शहरात भाजीपाला आणण्यासाठी येणार्‍यांची संख्या कमी झाली आहे. भाजीपाला, फळे, आणि अन्य अन्नपदार्थ कसे टिकवायचे असा प्रश्न अनेकांसमोर आहे. यातूनच हा पर्यायी मार्ग विद्यार्थ्यांनी तयार केला आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर दापोली येथील बीएसस्सी अ‍ॅग्रीकल्चरलच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या निहार वडके, वेदांत जोशी आणि प्राची गुरव या विद्यार्थ्यांनी ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेंतर्गत ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये ‘शून्य ऊर्जा शीतकपाट’ याची प्रत्यक्ष उभारणी करून त्या विषयी या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शीतकपाटाचे मोजमाप किती असावे, त्यासाठी कोणते साहित्य वापरले जाते, त्याची उभारणी कशाप्रकारे करावी, त्यासाठी किती खर्च येतो, या शीतकपाटाचे फायदे कोणते, ते कशाप्रकारे काम करते, याविषयी माहिती ग्रामीण भागात दिली जात आहे.

शून्य ऊर्जा शीतकपाटामध्ये १० ते १५ डिग्री सेल्सियस एवढे तापमान आणि ९० टक्के आद्रता कायम राखली जाते. त्यामुळे बाहेरच्या वातावरणात १/२ दिवसांनी न टिकणारा भाजीपाला, फळे इ. ४ ते ७ दिवसांपर्यंत या शीतकपाटात टिकू शकतात. अत्यंत कमी खर्चामध्ये, वीज न खर्च करता फ्रिजला पर्यायी म्हणून आपण नक्कीच वापरू शकतो. तसेच मोठ्या प्रमाणात भाजीपाला टिकावा तसेच भाजी विक्रेत्यांसाठी भाजी कशी जास्त दिवस टिकवता येईल यासाठी ‘शून्य ऊर्जा शीतकपाट’ हा एक चांगला उपाय आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.