विद्यापीठे, महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत कठोर नियमावली करणार- उदय सामंत

तीन महिन्यांत नियमावली तयार करणार, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची उपसभापती नीलम गोर्‍हे यांना ग्वाही

universities colleges will prepare regulations for the safety of students uday samant
विद्यापीठे, महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत कठोर नियमावली करणार- उदय सामंत

मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थींनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता यायला हवे. यासाठी सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयात विद्यार्थिनींची सुरक्षा ही शैक्षणिक संस्थांनी घ्यावी, अशी सूचना विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी केली आहे. यावर राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांचा परिसर छेडछाडमुक्त आणि सायबर सुरक्षायुक्त करण्यात येतील. यासाठी महिला सुरक्षिततेसंदर्भात नियमावली तयार करण्यात येईल, अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.

विधानभवनात काल, गुरुवारी नीलम गोर्‍हे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालये परिसरात विद्यार्थींनींच्या छेडछाडीच्या तक्रारींच्या अनुषंगाने उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गोर्‍हे म्हणाल्या, शैक्षणिक परिसर, वसतीगृह, ग्रंथालय, उपाहरगृहे ऑनलाईन शिक्षणामुळे सायबर सुरक्षा याबाबत पुरेशा उपाययोजना करून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर पालन करण्याची जबाबदारी महाविद्यालयांची आहे.

विद्यार्थींनींच्या तक्रारी आल्यानंतर त्यांना तत्काळ प्रतिसाद देऊन सहानुभूतीपूर्वक न्याय दिला पाहिजे. महाविद्यालयांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, प्रलंबित किती आहेत, ऑफलाईन आणि ऑनलाईन तक्रारींचे प्रमाण याचा अहवाल तयार करावा. अनेकवेळा महिला तक्रारीसाठी धाडसाने पुढे येत नाही. यासाठी संवाद समिती सुद्धा गठीत करावी. त्यामुळे महिला आपल्या अडचणी मोकळेपणाने सांगतील. या समितीमध्ये प्राध्यापक महिला, प्रशासकीय महिला, स्थानिक पोलीस प्रशासनातील प्रतिनिधी, सायबर संबंधातील प्रतिनिधी यांचा समावेश असावा, अशा सूचनाही नीलम गोर्‍हे यांनी केल्या.

तीन महिन्यांत नियमावली तयार करणार : उदय सामंत

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या नियमांचे, कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. ९० दिवसांचा कालावधी गृहित धरुन ही नियमावली तयार करण्यात यावी. यामध्ये शहरी भाग, छोटी शहर, ग्रामीण भाग, या परिसरातील शैक्षणिक संस्थांचा अभ्यास करुन सर्वसमावेश अशी नियमावली तयार करावी. ही नियमावली खासगी महाविद्यालये, विद्यापीठांनासुद्धा लागू राहील. तसेच विद्यार्थींनींच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल अ‍ॅप तयार करावे. त्यामुळे अशा प्रवृत्तीला आळा घालण्यास मदत होईल, अशा सूचना उदय सामंत यांनी प्रशासनाला केल्या.


तृणमूलची ‘खरेदी प्रक्रिया‘ गोव्याने ओळखली, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल