नियोजनाच्या अभावामुळे पाणीटंचाई

 खालापुरात ५२ ठिकाणी टँकर

मुबलक पाणी, भरमसाठ महसुली उत्पन्न असताना केवळ नियोजनाच्या अभावामुळे तालुक्यात इसांबे गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. पुढील दोन महिन्यात 52 ठिकाणी टँकर धावणार आहेत. यंदाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यात 27 गावे आणि 39 वाड्यांतून उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. इसांबे गावात तर मार्च महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

पाण्याची मुबलकता असूनसुद्धा केवळ नियोजनाअभावी तालुक्यातील गावे आणि वाड्या मिळून 66 ठिकाणी तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. जवळजवळ 21 गावे आणि 30 वाड्या अशा एकंदर 52 ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासनाकडून आलेला निधी आणि ग्रामपंचायतीचे लाखोच्या घरात महसुली उत्पन्न असतानादेखील नियोजनशून्य कारभारामुळे योजनांची कशी वासलात लागते याचे उदाहरण म्हणजे इसांबे ग्रामपंचायत आहे. गावाची पाणी योजना विहिरीवर असून सध्या विहीर कोरडी पडली आहे. त्यामुळे टँकरने विहिरीत पाणी टाकावे लागत आहे. इसांबे गावात आणखी दोन विहिरी आणि तलाव असून, त्यापैकी तलाव आणि एका विहिरीला मुबलक पाणी आहे. परंतु ते पाणी पिण्याकरिता न वापरता दैनंदिन गरजेसाठी वापरले जाते.

इसांबे गावाचे दोन भाग असून गावात साठ घरे आणि आदिवासीवाडी अशी पन्नास घरांची वस्ती आहे. मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागल्याने पाण्याची काटकसर आदिवासीवाडीत पहावयास मिळत आहे. या ठिकाणी असलेली रंगरंगोटी केलेली शौचालये वापराविना पडून आहेत. इसांबे ग्रामपंचायतीचे उत्पन्न 50 ते 60 लाखाच्या घरात असतानादेखील अद्यवयात जलशुद्धीकरण यंत्रणा राबविण्यात ग्रामपंचायतीला अपयश आले. यामुळे जलसाठा असूनदेखील टँकरच्या पाण्याने तहान भागविण्याची वेळ गावावर आली आहे.

इसांबे गावालगत खाजगी गृहप्रकल्प असून या ठिकाणी पाताळगंगा नदीतून पाणी उचलून त्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ही कल्पकता दाखविली जात असताना ग्रामपंचायत स्तरावर अपयश आल्यामुळे अनेक गावे व वाड्या तहानलेल्या आहेत.

गेल्या वर्षी मे महिन्यात शेवटच्या टप्प्यात चार-पाच गावांत पाणीटंचाई जाणवली होती. त्यामुळे यंदा टंचाई कृती आराखडा तयार करतानाच या गावांचा समावेश केला आहे. त्यामुळे टँकर मिळण्यास अडचण येणार नाही.         – संजय भोये, वरिष्ठ गट विकास अधिकारी, खालापूर