घरमहाराष्ट्रपुढील दोन दिवस मुसळधार पाऊस ,हवामान खात्याचा अंदाज

पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस ,हवामान खात्याचा अंदाज

Subscribe

दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पाऊस असला, तरी त्याचे प्रमाण अत्यल्प

अरबी समुद्रातून मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने तसेच बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असल्याने गुरुवारपासून कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. १० जुलैपासून पाऊस राज्यात सर्वदूर जोर धरण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. गुरुवारपासून दोन दिवस मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, सातार्‍यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पावसाच्या सक्रियतेनंतर पाण्यासाठी आणि दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकणार आहे.

राज्याच्या सर्वच भागांमध्ये गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मोसमी पाऊस क्षीण झाला आहे. दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पाऊस असला, तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे राज्याच्या बहुतांश भागातील पाणीसाठ्यांवर परिणाम दिसून येत आहे. त्याचप्रमाणे जूनच्या अखेरच्या टप्प्यात खरिपाच्या पेरण्या झालेला शेतकरीही दुबार पेरणीच्या संकटाच्या टांगत्या तलवारीमुळे चिंतेत आहे. पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिल्यामुळे काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला जातो आहे. हवामान खात्याच्या इशार्‍याप्रमाणेच गुरुवारी सकाळपासूनच मुंबई, ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातही काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनीही यासंदर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे.

- Advertisement -

अरबी समुद्रात सध्या मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे ८ किंवा ९ जुलैपासून कोकणात पावसाला सुरुवात होणार आहे. मध्य महाराष्ट्रापर्यंत त्याचा प्रभाव जाणवणार आहे. दुसर्‍या बाजूला बंगालच्या उपसागरातून कमी बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यानंतर ११ जुलैला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह मध्य भारतात ९ जुलैपासून पाऊस होणार असून, ११ जुलैला त्याचा जोर वाढणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -