घरमहाराष्ट्रआरेतील वन्यजीव, हिरवळ नष्ट करून काय मिळविणार? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल

आरेतील वन्यजीव, हिरवळ नष्ट करून काय मिळविणार? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल

Subscribe

मुंबई : आरेतील मेट्रोकार शेड कांजुरमार्ग येथे हलविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तरीही, सरकारने महाविकास आघाडीचा निर्णय रद्द करून आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अशाने आरेतील वन्यजीव व हिरवळ नष्ट करून सरकार काय साध्य करणार आहे, असा प्रश्‍न शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे.

आमदार रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेतून गोरेगाव पूर्वेकडील आरे येथे साकारण्यात आलेल्या ‘आय लव्ह गोरेगाव’, ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान’ व ‘बिरसा मुंडा चौक’चे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, महिला संघटक रचना सावंत, विधानसभा समन्वयक बाबा साळवी, भाई मिर्लेकर, माजी नगरसेवक रेखा रामवंशी, बाळा नर, प्रवीण शिंदे, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर, उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, बाळा साटम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

या लोकार्पण कार्यक्रमासाठी उपस्थितांना संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी, ‘आरे कारशेडला महाविकास आघाडीचा विरोध होता व यापुढेही राहील, असे स्पष्ट केले. मुंबईचे फुफ्फुस अशी ओळख असणार्‍या आरेमधील हिरवळ कायम रहावी म्हणून सुमारे 800 एकर जागा जंगल म्हणून घोषित केली. परंतु ईरेस पेटलेल्या विद्यमान सरकारने पुनश्‍च कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे येथील वन्यजीव व हिरवळ नष्ट करून सरकारला काय साध्य करायचे आहे, असा प्रश्‍न ठाकरे यांनी उपस्थित केला.

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या कारकिर्दीत कोट्यवधी रुपये दिल्याने सध्या आरेतील दिनकर देसाई हा मुख्य रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती आमदार रवींद्र वायकर यांनी दिली.

- Advertisement -

पुढचे सरकार आपलेच!
आरेतील मुख्य रस्त्याप्रमाणेच आरेतील अंतर्गत रस्तेही चांगल्यास्थितीत करण्यासाठीचा फाइलचा प्रवास अंतिम मंजुरीपर्यंत आला असतानाच, कपट कारस्थान करून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. परंतु याची चिंता नाही, कारण महाराष्ट्रात पुढील सरकार हे आपलेच येणार असल्याने, आरेतील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्‍नही निकाली काढण्यात येईल, असे आश्‍वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -