घरमहाराष्ट्रतुम्हाला मुंबईचा रंग का बदलायचा आहे? आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

तुम्हाला मुंबईचा रंग का बदलायचा आहे? आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

Subscribe

मुंबई – राज्यात अडीच वर्षांची सत्ता भोगल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेची सत्ता बळकाविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत धार्मिक तुष्टीकरण करण्याला सुरुवात केली आहे. पण आम्ही ठामपणे सांगतो ना मराठी, ना मुस्लिम उद्धवजींना मते देणार नाहीत. सलग २५ वर्ष तुम्ही मनपात सत्ता भोगली, मग तुमच्या कामावर तुम्ही मते का मागत नाहीत? एकही विकासकाम केल्याचे सांगता येत नाही, म्हणून मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी रडीचा डाव खेळण्याची सुरुवात करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे तुम्हाला मुंबईचा रंग का बदलायचा आहे? असा थेट सवाल जागर मुंबईचा या सभेतून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला. वांद्रे येथील सरकारी वसाहतीमध्ये मुंबई भाजपातर्फे आज जागर मुंबईचा या अभियानातंर्गत पहिली सभा संपन्न झाली.

यावेळी ते पुढे म्हणाले की, २२ ऑक्टोबर रोजी सामना दैनिकातून मराठी मुस्लिम अशी दुही निर्माण करणारी बातमी देण्यात आली होती. या बातमीवरुन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या लांगुलचालन करण्याच्या राजकारणाचा समाचार घेताना आशिष शेलार म्हणाले की, “आमच्या कोकणातील मराठी मुस्लिम बांधव आजपर्यंत कधीही वेगळी चूल मांडत नाहीत. ते सर्वांसोबत सण उत्सवात सुख दु:खात मिळून मिसळून राहतात मग तुम्ही का वेगळी चूल मांडताय? असा थेट सवाल उध्दव ठाकरे यांना केला.

- Advertisement -

खासदार पूनम महाजन यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबईकर आणि मराठी माणसाचे नाव घेऊन उद्धवजींच्या शिवसेनेने राजकारण केले. आज वांद्रे पूर्व येथून जागर मुंबईचा अभियानाची पहिली सभा होत आहे. हा जागर कशासाठी हे सांगताना पूनम महाजन म्हणाल्या की, मुंबईकरांना हक्काचे घर देण्यासाठी, सरंक्षण खात्याच्या, रेल्वेच्या, विमानतळाच्या, सरकारी वसाहतीमध्ये, फनल झोनमध्ये अडकलेल्या, रखडलेल्या एसआरए प्रकल्पामधील सर्व रहिवाशांना हक्काचे घर देण्यासाठी हा जागर होत आहे. हा जागर कशासाठी तर ट्राफिकची समस्या सोडविण्यासाठी. तसेच अद्ययावत हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्र उभारण्यासाठी हा जागर होत असल्याची भूमिका त्यांनी मांडला. आश्वासन नाही तर आता निर्णय होणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या सभेला खासदार पूनम महाजन यांनीही सभेला संबोधित करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. मराठी- गुजराती असा वाद निर्माण करताय? पण तुम्हाला याचा विसर का पडलाय की गुजरातचा भाजपाचे अध्यक्ष मराठी आहेत. गुजरातमध्ये मराठी माणसं हा झेंडा फडकवला त्याचा तुम्हाला अभिमान नाही का? मुंबईतील हा जागर अनेक प्रश्न विचारणार आहेच पण न सुटलेल्या मुंबईकरांच्या प्रश्नांचा जाब ही विचारणार आहे , असेही खासदार पुनम महाजन यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार अँड पराग अळवणी यांचेही भाषण झाले.

- Advertisement -

आमदार अतुल भातखळकर, महामंत्री संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष सुशम सावंत, विधानसभा अध्यक्ष राजेश जैन, माजी जिल्हाध्यक्ष सुहास आडिवरेकर, दिनानाथ तिवारी, माजी आ. तृप्ती सावंत, गणेश पांडे, महेश पारकर, निहारिका खोदले, जिल्हा महामंत्री दीपक अमित शेलार, नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, अलका केरकर, हेतल गाला आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -