घरदेश-विदेशवह्या, पुस्तकांच्या प्लास्टिक कव्हरवर बंदी?

वह्या, पुस्तकांच्या प्लास्टिक कव्हरवर बंदी?

Subscribe

राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली असून, त्याचा परिणाम आता शाळेच्या साहित्यांवरही होणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळा, महाविद्यालयीन वह्या, पुस्तकांवरील प्लास्टिकच्या कव्हरवर बंदी घातली जाणार आहे. मुलांमध्ये प्लास्टिकबंदी विषयी जागृती व्हावी म्हणून राज्य सरकारकडून याचा विचार सुरू आहे. तर बंदीच्या शक्यतेमुळे वह्या, पुस्तक विक्रेत्यांनीही प्लास्टिक कव्हरचा स्टॉक करून ठेवलेला नसल्याचे समजते.
प्लास्टिकने पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. त्याचा वापर करू नका म्हणून जगभर जनजागृती करण्यात येत आहे. प्लास्टिक पिशव्यांमुळे होणाऱ्या पर्यावरण हानीचा विचार करून राज्य शासनाने राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली आहे. मात्र प्लास्टिक पिशव्या उत्पादक उच्च न्यायालयात गेले असून, येत्या २३ जून रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.

प्लास्टिक बंदीवर राज्य शासन कायम

प्लास्टिक बंदीवर राज्य शासन कायम आहे. उलट यावर्षीपासून शाळा, कॉलेजच्या वह्या, पुस्तकांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक कव्हरवर बंदीचा विचार करत आहे. वह्या, पुस्तकांच्या कव्हरसाठी विद्यार्थ्यांनी प्लास्टिक वापरू नये म्हणून राज्य शासनाकडून शाळेचे संचालक, मुख्याध्यापकांना एक नोटीस पाठवली जाणार आहे. त्यात प्लास्टिकच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचे आदेशही देण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून समजते.
राज्य शासनाच्या पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून त्याबाबत एक अहवाल तयार करून तो पर्यावरण मंत्र्यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर या प्लास्टिक वापराबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे कळते. पावसात वह्या, पुस्तके भिजू नयेत म्हणून त्यावर प्लास्टिकची कव्हर्स घातली जातात. पण या प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे त्यावर बंदीचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ अशा राज्यांमध्येही प्लास्टिक कव्हरवर बंदी घालण्याचा विचार सुरू असल्याचे सुत्रांकडून समजते.

- Advertisement -

शाळा, कॉलेज सुरू होण्यापूर्वी वह्या, पुस्तकांची विक्री सुरू होते. पुस्तक वह्यांसाठी कव्हर्सही पालकांकडून घेतली जातात. पण यावर्षी प्लास्टिक कव्हर्सवर बंदी घालणार असल्याची कुणकुण आहे. त्यामुळे शाळेचे साहित्य विकणाऱ्या दुकानदारांनी प्लास्टिक कव्हर्सचा स्टॉक करून ठेवलेला नाही. राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर प्लास्टिक कव्हर्सचा स्टॉक केला जाईल.
– जितू शहा, विक्रेता.

पावसाळ्यात मुलांची पुस्तके, वह्या भिजू नयेत म्हणून आम्ही प्लास्टिकची कव्हर्स त्यावर घालतो. पण आता त्यावर बंदी येणार असेल तर ठिक आहे. मुलांमध्येही लहानपणापासून प्लास्टिकचा वापर कमीतकमी करण्याची सवय जडली पाहिजे. शेवटी प्लास्टिक त्यांच्याही भविष्यासाठी हानीकारक आहे.
– प्रिया सुर्यवंशी, गृहिणी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -