वाड्यातील तरुणांची अफलातून बोटकार

जमिनीसह पाण्यावरही चालते, जोंधळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश

ठाण्यातील शिवाजीराव जोंधळे विद्यालयातील ऑटोमोबाईल इंजिनिअरींगच्या तिसर्‍या वर्षात शिकणार्‍या ४ विद्यार्थ्यांनी जमीन आणि पाण्यावर चालणारी अफलातून बोटकार बनवली आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाल्याने या चारही विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक होत आहे. तन्मय पाटील (चिंचघर पाडा, ता. वाडा), प्रणय हाराळे (नवी मुंबई), दिप्तेश मांढरे (खांबाळा ता. भिवंडी) आणि चिन्मय चव्हाण (डोंबिवली) अशी या ४ विद्यार्थ्यांची नावे आहेत.

शहापूर येथील शिवाजीराव जोंधळे महाविद्यालयातील हे चारही विद्यार्थी ऑटोमोबाईल इंजिनिअरींगच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाकरिता प्रकल्प बनविण्यासाठी चौघांनी एकत्र येत बोटकारची संकल्पना मांडली. त्यानंतर त्यांनी यूट्यूबवर सर्च करत १९८५ साली बनवलेली ब्रिटिशकालीन कार पाहिली. त्याप्रमाणे त्यांनी एका वेगळ्या धाटणीची बोटकार बनवण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी फायबर टॅक, बॉक्स पाईप, स्प्लेंडर दुचाकीचे इंजिन, फोमलॉक, लोडो टायर, कास्टिंग रॉड, मेटल प्लेटस, डिस ब्रेक, चैन ड्राय व इको गाडीचे स्टिअरिंग असे साहित्य वापरून जमिनीसह पाण्यावर चालणारी कार बनवली. या कारची चाचणी घेतली असता ती दोन्ही ठिकाणी व्यवस्थितरित्या चालत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले.

२० दिवसांचा कालावधी
ही कार बनवायला त्यांना २० दिवसांचा कालावधी लागला, तर २० हजारांचा खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. याकामी त्यांना इंजिनिअर कॉलेजचे शिक्षक दिपक पाटील, महेंद्र पाटील, शिवाजी अय्यर यांचे मार्गदर्शन लाभले. बोटकार यशस्वीपणे साकारल्यानंतर तिला प्रकल्पासाठी जोंधळे महाविद्यालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

यूट्यूबवर सर्च केल्यानंतर ब्रिटिशकालीन कार आम्हाला दिसली. त्यानंतर आम्ही चौघांनी वेगळ्या धाटणीची बोटकार बनवली आहे. ही कार जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी व्यवस्थितपणे चालत आहे.
– तन्मय पाटील, विद्यार्थी, शिवाजीराव जोंधळे विद्यालय