घरक्राइमधक्कादायक! वाशिममध्ये भरदिवसा झेडपी शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले

धक्कादायक! वाशिममध्ये भरदिवसा झेडपी शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले

Subscribe

शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि कवी असलेले हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका शिक्षकाला भरदिवसा पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे वाशिम जिल्हा हादरला आहे.

वाशिम : शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि कवी असलेले हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका शिक्षकाला भरदिवसा पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक दिलीप धोंडू सोनुने यांना पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडल्याने वाशिम जिल्हा हादरला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भरदिवसा ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाले असून वैयक्तिक वादातून दिलीप सोनुने यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (ZP teacher was doused with petrol and burnt alive in Washim)

हेही वाचा – संभाजीनगर, नांदेडमधील घटना दुर्दैवीच, पण राजकारण करू नका; उदय सामंत यांचे आवाहन

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले दिलीप सोनुने हे त्यांच्या दुचाकीवरून शाळेत जात होते. यावेळी कोल्ही शिवारात दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी सोनुने यांची दुचाकी अडवली. त्यानंतर त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शिक्षक सोनुने हे गंभीररित्या जखमी झाले. यानंतर आरोपींनी माणुसकीच्या सर्व मर्यादा पार करत सोनुने यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळले. या घटनेनंतर अत्यावस्थेत असलेल्या सोनुने यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांना रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या हत्येच्या घटनेचा तपास हा जऊळका पोलिसांकडून करण्यात येत असून अज्ञातांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम घटनास्थळी दाखल झाली. या प्रकरणाचा जऊळका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप कुमार राठोड यांच्याकडून अधिक तपास करण्यात येत आहे. आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनकडून विविध टीम गठीत करण्यात आल्या आहेत. तर महत्त्वाची बाब म्हणजे या आधीही दिलीप धोंडूजी सोनवणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. तेव्हा ते बचावले होते. मात्र यावेळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुर्दैवी बाब म्हणजे या घटनेनंतर अर्धा तास सोनुने हे अर्धा तास रस्त्याच्या कडेला तडफडत होते. ज्यामुळे आता भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी (ता. 07 ऑक्टोबर) तीन जणांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये हेरंब कुलकर्णी यांच्या डोक्याला दुखापत झाली असून ते थोडक्यात बचावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेच्या काही वेळातच कुलकर्णी यांनी या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात केली. परंतु, घटनेच्या 48 तासानंतरही पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, ज्यानंतर हेरंब यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घटना घडल्याची माहिती दिली.

महत्त्वाची बाब म्हणजे, काही समाजकंटकांकडून समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे अपराध करणाऱ्यांवर कायद्याचा वचक राहिला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्याचे गृहमंत्री हे खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. परंतु ते या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याची विरोधकांकडून करण्यात येत आहे. हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -