घरमुंबईप्रशासकीय कामात १००% अंमलबजावणी अशक्य

प्रशासकीय कामात १००% अंमलबजावणी अशक्य

Subscribe

सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच मुंबई शहर हे सुंदर, उत्तम आणि सर्वश्रेष्ठ असावे हेच माझे स्वप्न आहे. हे शहर सर्वश्रेष्ठ बनले पाहिजे. एक बेस्ट सिटी म्हणून नावलौकिक कायम राहायला पाहिजे, यासाठीच आपला प्रयत्न आहे, असा मानसच महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नववर्षानिमित्त व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी असतानाही सर्वसामान्यांच्या नजरेतून अजोय मेहता पाहत आहेत. दैनंदिन नागरी सेवा सुविधांसह विकास प्रकल्प हाती घेत मुंबईला सर्वश्रेष्ठ शहर बनवण्याचा संकल्प आहे. फक्त यासाठी मुंबईकरांची साथ हवी, असेच आवाहन त्यांनी केले आहे.
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नूतन वर्षाच्या मुंबईकरांना शुभेच्छा देताना हे शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा संकल्प केला आहे. महापालिकेच्या विविध योजना आणि विकास प्रकल्पांबाबत यासंदर्भात आयुक्तांशी जाणून घेतले असूनही त्यांनी प्रत्येक मुद्यावर मनमोकळेपणाने उत्तरे दिली आहेत.

प्रश्न : महापालिकेच्यावतीने मोठ्या प्रमाणात प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील आपला ड्रीम प्रोजेक्ट कोणता?

- Advertisement -

अजोय मेहता : महापालिका अशी संस्था आहे की तिथे ड्रीम प्रोजेक्ट गृहीत धरून चालता येत नाही. एक प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट होऊ शकत नाही. प्रकल्प आणि दैनंदिन नागरी सुविधा यांचा ताळमेळ घालावा लागतो. दैनंदिन सेवा सुविधांची कामेही तेवढीच महत्त्वाची आहेत. त्यामुळे हे सांगू शकत नाही की, माझे ड्रीम प्रोजेक्ट कोणते आहे. शहातील रोगराई नाहीशी करण्यासाठी काम करावे लागते. त्यासाठी स्वच्छता राखली गेली पाहिजे. रोगराई पसरू नये, यासाठी प्रतिबंध करायला हवा. आमची हॉस्पिटल्स चांगली असायला हवीत. पण त्याचबरोबर दीर्घकालिन प्रकल्पही तेवढेच महत्त्वाचे आहेत. मग तो कोस्टल असो, मलनि:सारण प्रकल्प असो वा इतर प्रकल्प असो…या दोन्हींचे संतुलन राखले गेले पाहिजे. दोन्ही समांतर हाताळले गेले पाहिजेत. आम्ही स्वच्छतेमध्ये खूप काम करत आहोत. पाणीपुरवठ्यात टनेलचीही कामे केली आहेत. तसेच डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी कामे झाली आहेत. दोन्ही बाबींचा विचार करतच पुढे जावे लागते. तिथे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून अमुकच एका प्रकल्पाला पसंती देता येत नाही.

प्रश्न : दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आढावा बैठक घेण्याची संकल्पना मांडून आपण सर्व अधिकार्‍यांशी चर्चा करता. त्यात महिन्याचा मानकरी म्हणून एखाद्या अधिकार्‍याची घोषणा करता. या आढावा बैठकीचा परिणाम कामकाजात दिसतो का?

- Advertisement -

अजोय मेहता: आढावा बैठकीबाबत म्हणाल तर त्यामध्ये तीन परिणाम दिसतात. एक म्हणजे या महिन्यात काय काय काम झाले याचा आढाव घेता येतो. जर झाले नसेल तर दुरुस्त करता येते. दुसरे म्हणजे पुढच्या महिन्याचा अजेंडा काय राहणार, प्राधान्य काय राहणार. ते सर्वांना एकाच व्यासपीठावर सांगण्याची एक संधी असते आणि तिसरे म्हणजे महापालिकेचा व्याप इतका मोठा आहे की, एका बाजूला मध्यवर्ती यंत्रणा आणि दुसर्‍या बाजूला विभागीय कार्यालये. यांच्यामध्ये समन्वय साधण्यात आपल्याला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. समजा मध्यवर्ती यंत्रणेच्या माध्यमातून नाला रुंदीकरणाचे काम हाती घेतले असेल. त्याचे टेंडर झाले असेल; पण त्यावर जर झोपड्या असल्याने आणि त्या काढल्याशिवाय कंत्राटदाराला काम करता येत नसेल, तर त्या झोपड्या काढण्याची जबाबदारी ही विभाग कार्यालयाची असल्याने त्यांना त्या काढावयास लावणे. अशाप्रकारे दोघांमधील समन्वयाने प्रश्न सोडवण्यात आले आहेत. महिन्याच्या मानकर्‍याबाबत जर आपण बोलत असाल, तर त्या अधिकार्‍याला एक अभिमान वाटतो की, महापालिकेतील माझ्या कामाची ओळख सर्वांसमोर येते. आम्ही त्यांना काही पुरस्कार देत नाही. त्यांना फक्त प्रमाणपत्रच देतो. त्यामुळे तो अधिकारी अजून जोमाने काम करतो. इतरांनाही मग वाटते की आपण अशाचप्रकारे काम केल्यास आपलाही गौरव होईल.

प्रश्न : आढावा बैठकीत आपण आदेश तसेच सूचना करता, परंतु त्याची 100 टक्के अंमलबजावणी होताना दिसत नाही, त्याचं काय ?

अजोय मेहता: पहिले तर एक सांगू तुम्हाला, प्रशासनामध्ये किंवा सिस्टीममध्ये 100 टक्के अंमलबजावणी होतच नाही. 100 टक्के काम होणे म्हणजे पेपर फुटला. 100 टक्के तर शक्यच नाही. आपला प्रयत्न असतो की जास्तीत जास्त काम व्हावे. दुसरे म्हणजे जे काम झाले नाही, ते का झाले नाही. मग ते समजून घ्यावे की, का झाले नाही. आपल्या सूचना अव्यवहार्य होत्या का? सूचनांची अंमलबजावणी करताना अडचणी आल्या का? ते जाणून घेता येते. तुम्ही त्या प्रश्नाला सामोरे जाऊन ते काम न होण्यामागची कारणे शोधली जाणे महत्त्वाचे असते.

प्रश्न : विकास आराखड्याचे शिवधनुष्य पेलत तो पूर्ण केलात. त्याची आता अंमलबजावणी सुरू झालीय, याबाबत काय वाटतेय?

अजोय मेहता : विकास आराखडा हा 20 वर्षांतून एकदाच येतो. ती संधी आयुक्त म्हणून मला लाभली. याचा आनंदच आहे. विकास आराखडा दोन प्रकारे महत्त्वाचा असतो. एक म्हणजे जमिनीच्या वापराचा प्रकार. म्हणजे मुंबई शहराची जी जमीन आहे ती कशाप्रकारे वापरता येईल. त्याच्यामध्ये प्राधान्य कसे राहील ते ठरवता येते. जे बांधकामाचे नियम आहेत, त्याचा विचार करत हा विकास आराखडा तयार झाला आहे. हा एका मोठ्या प्रमाणात सर्वांच्या सहभागातून बनवला गेला आहे. हा एकटाच कुणी बनवू शकत नाही. मी म्हणू शकत नाही की एकट्यानेच मी तो तयार केला आहे. खूप मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग यात सहभागी झाला होता. नागरिकांकडून सूचना घेण्यात आल्या होत्या.स्वयंसेवी संस्था पुढे आल्या होत्या सूचना द्यायला. पत्रकारांच्या सूचना आल्या आहेत. वृत्तपत्रातील संपादकीयही आम्ही वाचली होती. त्यामध्येही चांगल्या चांगल्या सूचना आल्या होत्या. त्या सर्वांचा संंमिश्र विचार करून हा विकास आराखडा बनवला गेला आहे. ते एकट्याचे काम होऊ शकत नाही.

प्रश्न: फेरीवाला धोरण योजना यशस्वी होते असे वाटते का?
अजोय मेहता : फेरीवाला धोरणाचे काम सुरू आहे. त्यांना बसण्यासाठी जागा निश्चित करता यावी म्हणून पिचेस आखणे, त्यांना परवाना देणे अशी कामे सुरू आहेत. यामध्ये दोन्ही बाजूंच्या लोकांची विविध मते आहेत. जे रहिवाशी असतात त्यांना आपल्या घराशेजारी फेरीवाले नको असतात. मग शेवटी त्यांना बसवायचे कुठे? म्हणजे लोकांना कमीतकमी त्रास होईल, तसे ठिकाण निवडायचे. हा एक कसरतीचा भाग आहे. तो तेवढा सोपा नाही. आता प्रत्येकाकडे लायसन्स आहे किंवा नाही? लायसन्ससाठी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे, हे सगळेच मेहनतीचे काम आहे. पण यामधून मार्ग काढू. मला वाटते आम्ही यातून बराचसा मार्ग काढलेला आहे.

प्रश्न : प्लास्टिक बंदी फसली की महापालिकेची यंत्रणा कमी पडली?
अजोय मेहता: प्लास्टिक बंदीची योजना ना तर फसली, आणि नाही महापालिका कमी पडली. प्लास्टिक बंदीचे दोन भाग आहेत. एक म्हणजे लोकांची प्रवृत्ती बदलणे. दुसरे म्हणजे कायद्याचा वापर करून त्यांच्यावर बंदी आणणे. या दोन्ही बाबी एकत्रितच आहेत. जिथे तुम्ही म्हणत असाल की लोकांची प्रवृत्ती बदलायला हवी. तर मी म्हणेन की लोकांची प्रवृत्ती बदली आहे. खूप मोठ्याप्रमाणात प्रवृत्ती बदलली आहे. आता तुम्हीच पहा, लोक स्वत:हूनच प्लास्टिक पिशवी नको म्हणून सांगतात. त्यामुळे मुंबईकरांचे आभार मानायला पाहिजेत. जिथे कायद्याचा धाक दाखवून बंदी करायची आहे ते पण सुरूच आहे!

प्रश्न :- स्थायी समितीत आणि महापालिका सभागृहात फेटाळलेले प्रस्ताव पुन्हा पटलावर आणून मंजूर करून घेण्याची किमया साध्य करत आहात. आतापर्यंत अशाप्रकारे कोणत्याही आयुक्तांना अशाप्रकारची किमया साधता आलेली नव्हती. तुम्ही ही भूमिका कशी पार पाडता?

अजोय मेहता : स्थायी समिती व महापालिकेचे प्रश्न समजून घ्यायला हवेत. कायदा काय आहे? लोकप्रतिनिधींचे म्हणणे काय आहे? कायद्याच्या चौकटीबाहेर तर आम्ही जाऊ शकत नाही. कायदा काय आहे, हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देतो. कायद्यानुसारच निर्णय घ्यावा, असे माझे ठाम मत आहे. त्यानुसार स्थायी समिती व महापालिकेच्या निदर्शनास आणून देण्याचे काम आम्ही करतो. आता निर्णय घ्यायचा अधिकार त्यांचा असतो. दोन्ही अंगानी त्यांचे काम केले जाते. त्यामुळेच यापूर्वी नामंजूर झालेले किंवा फेटाळलेेले प्रस्ताव पुन्हा संमत होऊ शकले आहेत.

प्रश्न :नव्या वर्षात मुंबईकरांना काय भेट द्याल. कोणती नवीन संकल्पना आहे?

अजोय मेहता : मी काय भेट देणार. सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न आहे की, माझी मुंबई सुंदर, उत्तम आणि सर्वश्रेष्ठ असावी. तेच माझेही स्वप्न आहे. सर्वश्रेष्ठ शहर बनवणे. बेस्ट सिटी निर्माण करण्याचा माझा मानस आहे. सर्व बाजूंनी आमचे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्प सुरू आहेतच. स्वच्छतेमध्ये वर्गीकरण करणे, मलजल शुध्दीकरण प्रकल्प राबवणे, पूरपरिस्थितीबाबत मागच्या वर्षी ज्या उपाययोजना राबवल्या होत्या, त्यात काही सुधारणा करणे अशाप्रकाच्या योजना, प्रकल्प, तसेच दैनंदिन नागरी सेवा सुविधांची कामे करून मुंबईला स्वच्छ आणि श्रेष्ठ शहर बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -