घरमुंबईनववर्षात दहिसर ते वांद्रे नॉनस्टॉप

नववर्षात दहिसर ते वांद्रे नॉनस्टॉप

Subscribe

एमएमआरडीएचा २०१९चा संकल्प

मुंबईतल्या प्रवासात पिक अवर्समध्ये दहिसर ते वांद्रे प्रवासादरम्यान तीन ते चार तासांचा चुराडा हा वाहनचालकांना आता नित्याचा झाला आहे. पण नवीन वर्षात हाच प्रवास काहीसा सुखद होणार आहे तो मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पुढाकारामुळे. दहिसर ते वांद्रे प्रवासादरम्यान सिग्नल फ्री ट्रॅफिक चालवण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. मुंबईकरांना सुखद आणि स्वस्त प्रवासासाठी एक्सेस कंट्रोल सिस्टिम हा प्रकल्प मुंबईत तसेच भारतातही राबविण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी प्रतिक्षालय, मिनी फुडमॉल, गुणवत्तापूर्ण स्ट्रिट फर्निचर, बस सेवेसाठी डेडिकेटेड लेन यासारख्या सुविधादेखील या प्रकल्पात असणार आहेत. सध्याच्या विचित्र पद्धतीने होणार्‍या पार्किंगवरही उपाय शोधण्यात येणार आहे.

दहिसर ते वांद्रे प्रवासादरम्यान सध्याच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ पाहता वाहनांचा वेग वाढवणे हा एक्सेस कंट्रोल सिस्टिमचा मुख्य उद्देश आहे. महत्त्वाचे म्हणजे जंक्शनच्या ठिकाणच्या सिग्नलमार्फत होणारी वाहनांची अडवणूक या पर्यायामुळे होणार नाही. सध्या वाहनांना सिग्नलच्या ठिकाणी अनेक मिनिटांची करावी लागणारी प्रतीक्षा त्यामुळे कमी होईल. एक्सेस कंट्रोल सिस्टिममध्ये आणखी एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीची कनेक्टिव्हिटी असणार आहे.

- Advertisement -

दहिसर ते वांद्रे १९ सिग्नल
१ दहिसर टोल प्लाझा
२ रावळपाडा
३ नॅशनल पार्क
४ टाटा पॉवर हाऊस (मागाठाणे)
५ दत्तानी पार्क
६ महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा
७ टाईम्स ऑफ इंडिया
८ पठाणवाडी
९ ओबेरॉय जंक्शन
१० आरे कॉलनी जंक्शन
११ जोगेश्वरी बिंबिसार नगर
१२ जेव्हीएलआर जंक्शन
१३ अंधेरी मेट्रो जंक्शन
१४ गोल्डस्पॉट जंक्शन
१५ इंटरनॅशनल एअरपोर्ट
१६ विलेपार्ले जंक्शन
१७ वाकोला जंक्शन
१८ खेरवाडी
१९ वांद्रे कलानगर

स्त्यालगतच्या प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि प्रतिक्षेसाठी गुणवत्तापूर्ण असे स्ट्रीट फर्निचर तसेच पार्किंग सोल्यूशनही एक्सेस कंट्रोल सिस्टिममध्ये अमलात आणण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न असणार आहे.

- Advertisement -

एक्सेस कंट्रोल सिस्टिम हा मुंबईतला पहिल्या नागरी वाहतूक क्षेत्रातील प्रकल्प आहे. त्यामुळेच या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. एक्सेस कंट्रोलसाठी सल्लागार नेमणुकीनंतर चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत सविस्तर प्रकल्प हा एमएमआरडीए आणि सल्लागार यांच्या संयुक्त पुढाकारातून अहवाल तयार करण्यात येईल. सल्लागाराच्या अहवालावर आधारीत एक्सेस कंट्रोल सिस्टिम प्रकल्पाच्या अंमलबजावणीची पुढची दिशा ठरणार आहे. सध्या एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी स्वारस्याची निविदा प्रक्रिया राबवली आहे. येत्या आठवड्याभरातच या प्रकल्पासाठीची निविदापूर्व बैठक पार पडणार आहे. त्यानंतर महिन्याच्या अखेरीस सल्लागाराची निवड होणे अपेक्षित आहे.

सल्लागारांमार्फत दहिसर ते वांद्रे दरम्यानच्या सध्याच्या प्रवासासाठी लागणारा सरासरी वेळ, पिक अवर्समधील वेळ, ऑफ पिक अवर्समधील वेळ तसेच जंक्शनच्या ठिकाणचा प्रतीक्षा कालावधी याचा अभ्यास करण्यात येणार आहे. या सगळ्या गोळा केलेल्या डेटाचे अ‍ॅनॅलिसिस करण्यात येईल. वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील हे सल्लागाराकडून अपेक्षित आहे. त्यानुसारच टप्पेनिहाय या प्रकल्पाअंतर्गत कामे करण्यात येतील.

दहिसर ते वांद्रे दरम्यान अनेक फ्लायओव्हर हे वेगवेगळ्या यंत्रणांच्या मालकीचे आहेत. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारितील फ्लायओव्हरचा समावेश आहे. एक्सेस कंट्रोल सिस्टिमच्या प्रकल्पामध्ये फ्लायओव्हर कमी करण्यापासून ते एकमेकांशी जोडण्यासारख्या पर्यायाचा विचार करण्यात येईल, असे अपेक्षित आहे. सध्या अंधेरीपासून ते दहिसरच्या दिशेने एका बाजूला मुंबई मेट्रो प्रकल्पाअंतर्गत काम सुरू आहे. त्यामुळे या कामाची डेडलाईन पाहूनच या टप्प्यातील कामाचा विचार करावा लागेल. तर अंधेरी ते वांद्रे दरम्यानच काम हे पहिल्या टप्प्यात करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.

दहिसर ते वांद्रे दरम्यान सलग प्रवास करणार्‍या वाहनांची संख्या सरासरी ३५ टक्के ते ४० टक्के इतकी आहे. या वाहनांना एक्सेस कंट्रोल सिस्टिमचा फायदा होईल. हा संपूर्ण प्रकल्प कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे याचा अभ्यास सिम्युलेशनच्या माध्यमातूनही करण्यात येईल. सिम्युलेशनच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वाहतूक कोंडीतला कालावधी किती प्रमाणात कमी करता येईल याचा अभ्यास करणे शक्य आहे.

एक्सेस कंट्रोल सिस्टिम
सिग्नल विरहित अशी सिस्टिम म्हणून एक्सेस कंट्रोल सिस्टिम काम करते. यामध्ये व्हेईकल प्रायोरिटी सिस्टिमचा समावेश आहे. ऑटोमॅटिक बुम गेट्सच्या माध्यमातून वाहनांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. या गेट्ससाठी आरएफआयडी तसेचकार्ड सिस्टिमचा वापर करण्यात येतो.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या कनेक्टिव्हिटीमध्ये एक्सेस
कंट्रोल सिस्टिमच्या माध्यमातून स्वस्त असा पर्याय देण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे हा मुंबई शहराची शान व्हावा हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर लोकोपयोगी आणि गुणवत्तापूर्ण सुविधा देण्याचा हा प्रयत्न असणार आहे. या प्रकल्पाच्या यशानुसार इतर मार्गावर या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल. मुंबईचे एक्सेस कंट्रोल सिस्टिम रोलमॉडेल व्हावी हा आमचा उद्देश आहे.
– के. विजयालक्ष्मी,विभागप्रमुख, ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड कम्युनिकेशन,एमएमआरडीए

मुंबईतील सर्वात बिझी असणार्‍या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ट्रॅफिकच्या निमित्ताने अनेक प्रयत्न करण्यात आले होते. एक्सेस कंट्रोल सिस्टिमसाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. हा मुंबईतला पहिलाच प्रकल्प आहे. मुंबईतील पिक अवर्समधील वाहतूक सुरळीत व्हावी हाच या प्रकल्पामागील उद्देश आहे.
– आर. ए. राजीव,आयुक्त, एमएमआरडीए

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -