घरमुंबईपालिकेकडून डासांची ११ हजार उत्पत्ती स्थाने नष्ट; ४ लाख पाण्याच्या टाक्यांची तपासणी

पालिकेकडून डासांची ११ हजार उत्पत्ती स्थाने नष्ट; ४ लाख पाण्याच्या टाक्यांची तपासणी

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिका आरोग्य खात्याच्या कीटकनाशक विभागाने (BMC Pesticide Department) पावसाळी आजारांना रोखण्यासाठी शहर आणि उपनगरांमध्ये भेटी देऊन व पाहणी करून मलेरिया वाहक ॲनोफिलीस डासांची तब्बल १० हजार ७८८ उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात केली आहेत.

मुंबई महापालिका आरोग्य खात्याच्या कीटकनाशक विभागाने मलेरिया, डेंग्यू यांसारख्या पावसाळी आजारांना रोखण्यासाठी मुंबईत पावसाळ्यापूर्वीच बांधकामे, गॅरेज, झोपडपट्टी, सोसायटी आदी ठिकाणी कीटकनाशके फवारणी व अन्य उपाययोजना करून डासांची उत्पत्ती रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच, डासांचा उद्रेक रोखण्यासाठी धुम्रफवारणी केली जाते. कीटकनाशक विभागाकडून १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत शहर, उपनगरांमध्ये एकूण ४९ हजार ४७६ भेटी देऊन व पाहणी करून मलेरिया वाहक ॲनोफिलीस डासांची तब्बल १० हजार ७८८ उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली आहेत. तसेच, मुंबईत ४ लाख ४७ हजार १८८ पाण्याच्या टाक्यांची कडक तपासणी केली आहे. यासंदर्भातील माहिती महापालिका कीटकनाशक विभागामार्फत देण्यात आली आहे. नागरिकांनी, आपल्या घरात, परिसरात उघड्यावर पाणी असणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आहे.

- Advertisement -

मलेरिया, डेंग्यू विरोधात पालिकेची उपाययोजना
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो आदी पावसाळी आजारांचे रुग्ण वाढतात. रुग्णांनी आजाराकडे दुर्लक्ष केल्यास अथवा आजार वाढल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. यापूर्वी अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका आरोग्य विभाग मलेरिया, लेप्टो, डेंग्यू आदींसारखे आजार वाढू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना पावसाळ्यापूर्वी अंमलात आणते. कीटकनाशके व धूम्रफवारणी, डासांची व्युत्पत्ती स्थाने यांचा शोध घेऊन ती नष्ट करणे, डास नष्ट करण्यासाठी गप्पी मासे गटारात सोडणे आदी उपाययोजना पालिका आरोग्य खाते, कीटकनाशक विभाग करते. त्यासाठी, कीटकनाशक खात्यातील सुमारे १ हजार ५०० अधिकारी व कर्मचारी या डास विरोधी मोहीमेत कार्यरत असतात.
मलेरिया पसरविणाऱ्या ॲनोफिलीस या डासांची वर्षभरात १० हजार ७८८ एवढी उत्पत्तीस्थळे शोधून नष्ट करण्यात आली. यापैकी सर्वाधिक म्हणजे २ हजार ४१८ एवढी उत्पत्तीस्थळे जुलै २०२२ मध्ये नष्ट करण्यात आली तर, त्या खालोखाल ऑगस्ट महिन्यात २ हजार १२८, जून महिन्यात १ हजार ४९६, सप्टेंबर महिन्यात १ हजार ३३७ इतकी उत्पत्तीस्थळे शोधून नष्ट करण्यात आली आहेत.
नागरिकांनी आपल्या घरामध्ये व घराजवळच्या परिसरात कुठेही साचलेले पाणी असणार नाही, याबाबत सजग व सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच साचलेले पाणी आढळून आल्यास ते तात्काळ नष्ट करण्याची कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

एका मादी डासामुळे ४०० ते ६०० डासांची उत्पत्ती
डासांच्या प्रत्येक उत्पत्ती स्थानाच्या ठिकाणी एकावेळी एक मादी डास १०० ते १५० अंडी घालते. एका मादी डासाचे सरासरी आयुर्मान हे ३ आठवड्यांचे असते. या तीन आठवड्यांच्या कालावधीत मादी डास किमान ४ वेळा साचलेल्या पाण्यात अंडी घालते. म्हणजेच एका मादी डासामुळे साधारणपणे ४०० ते ६०० डास तयार होत असतात. हे डास मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याची व ती नष्ट करण्याची कार्यवाही नियमितपणे केली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -