घरमुंबई३५ वर्षांनी ‘तो’ भावाला सापडला, पण त्याआधीच नियतीचा घात

३५ वर्षांनी ‘तो’ भावाला सापडला, पण त्याआधीच नियतीचा घात

Subscribe

३५ वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरुन घर सोडून निघून गेलेल्या एका इसमाचा अपघात झाल्याने शोध लागला, पण ३५ वर्षांंपासून त्याला भेटण्यासाठी धडपडणार्‍या त्याच्या घरच्यांना अखेरपर्यंत भेटताच आले नाही. पनवेल रेल्वे स्थानकाच्या पायरीवरुन पडल्याने पोलिसांना त्यांच्या नातलगांचा शोध लागला. त्यानुसार नातलगांना कळवलेही. त्याप्रमाणे भाऊ प्रदीप ३५ वर्षांनंतर भाऊ भेटणार, या आनंदात तातडीने जे.जे. रुग्णालयात पोहोचला, परंतु नियतीला त्यांची भेट मान्य नव्हती. त्यामुळे प्रदीप रुग्णालयात पोहोचताच त्याच्या भेटीपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

रत्नागिरीतील दुर्घवाडी या गावातून संजय कदम (५५) हा ३५ वर्षांपूर्वी किरकोळ कारणातून झालेल्या भांडणामुळे घर सोडून गेला. त्यानंतर तो आजतागायत घरी परतलाच नाही. त्या दरम्यान त्याचे आई-बाबा आणि भाऊ कायम त्याचा शोध घेत राहिले,पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर कंटाळून त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध थांबवला. घरर सोडल्यानंतर संजयने सरळ मुंबई गाठली होती. मुंबईत ठिकठिकाणी फिरुन उदरनिर्वाह केल्यानंतर पनवेल रेल्वे स्थानकाजवळ एका रेल्वे पुलाखाली त्याने त्याचे बस्तान बसवले होते. कित्येक वर्षांपासून तो त्या पुलाखाली राहत होता. भीक मागून जगत होता. २ नोव्हेंबर रोजी पनवेल रेल्वे स्थानकाच्या पायर्‍या उतरत असताना तो खाली पडला आणि त्याचा अपघात झाला. या अपघातात संजय कदम जखमी झाला होता. पनवेल रेल्वे पोलिसांनी त्याच्या घरच्यांचा शोध घ्यायचे ठरवले. त्याच्याकडून रत्नागिरीतील दुर्घवाडी या गावाबद्दल समजले. रेल्वे पोलिसांनी रत्नागिरीतील सावर्डे पोलिसांच्या मदतीने तेथील स्थानिक लोकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर संजय कदम यांच्या नावासहीत फोटो पाठवण्यात आले.

- Advertisement -

दरम्यानच्या काळात मुलगा सापडत नाही, याचे दुःख सहन न झाल्याने काही वर्षांपूर्वीच संजयच्या आई-वडिलांचे निधन झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पण संजयचा भाऊ हा ठाण्यात राहत असल्याची माहिती रत्नागिरीतून सावर्डे पोलिसांनी दिली. त्यानुसार पनवेल पोलिसांनी त्याला संपर्क करुन संजयबद्दल माहिती दिली. संजयचा भाऊ प्रदिप कदम हा लागलीच भावाला भेटण्यासाठी जे.जे रुगणालयात पोहोचला, मात्र भेटआधीच उपचारादरम्यान संजय कदमचा मृत्यू झाला. भावाच्या अशा जाण्याने प्रदिप कदम यांना धक्का बसला. पनवेल रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून रितसर पद्धतीने संजयचा मृतदेह त्याच्या भावाकडे सोपवला असल्याची माहिती पनवेल रेल्वे पोलिसांनी दिली.

रेल्वे हद्दीत हा अपघात घडल्याने आम्ही त्याला जे.जे रुगणालयात दाखल केले होते. त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या थोड्याशा माहितीवरुन आम्ही रत्नागिरीतील सावर्डे पोलिसांच्या मदतीने त्याच्या भावाला गाठले. पण अपघातामुळे गंभीर जखमी झालेला संजय वाचू शकला नाही.
-अरूण कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक,पनवेल लोहमार्ग पोलीस ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -