घरमुंबईघर सोडलेल्या बालकांना ठाण्यातील ‘समतोल’चा आधार

घर सोडलेल्या बालकांना ठाण्यातील ‘समतोल’चा आधार

Subscribe

वर्षभरात ७०० मुलांचे पुनर्वसन,आतापर्यंत १ हजारहून अधिक बालकांची करून दिली कुटुंबाशी भेट

हरवलेल्या, घरातून पळून आलेल्या आणि अपहरण होऊन रेल्वे स्थानकांवर आलेल्या ७०० बालकांचे पुनर्वसन ठाण्याच्या समतोल फाऊंडेशनने गेल्या २०१९ या वर्षात केले आहे. कल्याण ते मुंबई सीएसएमटी पर्यंतच्या रेल्वे स्थानकांवर राहणार्‍या पंजाब आणि केरळ हे राज्य वगळता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील बेघर मुलांचा यामध्ये समावेश आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे आणि जळगाव असे पाच जिल्हे तर १० रेल्वे जंक्शन अशा ठिकाणी बेघर असणार्‍या बालकांना समतोलने मदत केली आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षभरात कल्याण ते मुंबई सीएसएमटी या स्थानकांवरून पोलीस आणि काही दक्ष नागरिकांनी माहिती दिल्याने ही मुले समतोल फाऊंडेशनच्या सानिध्यात आली. ही बालके महाराष्ट्रातील विविध भागातून आलेली होती. ६ ते ८ वयोगटातील बेघर मुलांशी संवाद साधल्यावर प्रामुख्याने कौटुंबिक समस्या आणि मुलांची फसवणूक करून त्यांना पळवून आणलेल्या बालकांचे रेल्वे स्थानकावर वास्तव्य असल्याचे समतोल फाऊंडेशनचे संस्थापक यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले.

- Advertisement -

या बेघर बालकांशी संवाद साधून समतोलच्या ६० कार्यकर्त्यांची टीम त्यांच्या घरचा पत्ता शोधून त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्याचे कार्य सातत्याने करत आहे. वर्षभरातील ७०० बालकांना महिला व बालकल्याण विभाग, बालगृह आणि वेगवगळ्या सामाजिक संस्थांकडे सुपूर्द करून त्यांचे पुनर्वसन केले आहे. २००५ पासून समतोलने साधारण १ हजार हून अधिक बालकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे मनपरिवर्तन आणि समुपदेशन केले आणि या घर सोडून आलेल्या बालकांना आपल्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले आहे.

कुटुंबातील अडचणींना कंटाळून, अपहरण होऊन किंवा शहरी जीवनाच्या आकर्षणाने दररोज शेकडो मुले घरापासून दूर मुंबईच्या दिशेने येतात. नाईलाजाने किंवा माहितीच्या अभावी या मुलांना निवार्‍यासाठी आणि उपजिविकेसाठी रेल्वे स्थानकांचा आधार घ्यावा लागतो. रेल्वेने प्रवास करत असताना भीक मागणारी अनेक मुले आपल्याला दिसतात. त्यावेळी नकळत आपल्याकडून फक्त खंत व्यक्त केली जाते, पण बर्‍याचदा त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही. सामाजिक भान जपणारे काही जागृत नागरिक अशा मुलांना पोलीस स्टेशन किंवा सामाजिक संस्थांकडे घेऊन जातात. मात्र, पुढे त्या मुलांची देखभाल त्यांच्याकडून घेतली जाते असे नाही. परंतु, या मुलांना एकत्र करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्याचे कार्य समतोल फाऊंडेशन २००५ पासून सातत्याने करत आहे.

- Advertisement -

घराची संपर्क तुटलेल्या बालकांना आपल्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य संस्था निःस्वार्थी भावाने करत आहे. ठाण्यासह मुंबई, पुणे, भुसावळ, जळगाव, नागपूर आणि अकोल्यात हे काम सुरू असून आतापर्यंत १० हजार पेक्षा जास्त मुलांना आपल्या घरी सोडले आहे.
– विजय जाधव, समतोल फाऊंडेशन, संस्थापक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -