घरदेश-विदेशकरोनाचा जगभरात संसर्ग

करोनाचा जगभरात संसर्ग

Subscribe

भारतासह २५ देशांमध्ये प्रादुर्भाव, १४,५६२ चिनी नागरिक बाधित ,चीनमधील ई-व्हिसाला तात्पुरती स्थगिती,पाकिस्तानी विद्यार्थी वुहानमध्ये वार्‍यावर

भारताने रविवारी चीनमधून भारतात येणारे चिनी नागरिक तसेच चीनमध्ये स्थायिक असलेल्या अन्य देशांतील नागरिकांच्या ई-व्हिसाला तात्पूरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. चीनमध्ये थैमान घातलेल्या करोना व्हायरसमुळे सुमारे ३०० जणांना जीव गमवावा लागला, तर १४ हजार ५६२ जण अद्याप या व्हायरसने बाधित झालेले आहेत. तसेच हा व्हायरस सध्या भारत, ब्रिटेन, अमेरिकेसह तब्बल २५ देशांपर्यंत पोहोचला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव चीनमधील भारतीय दूतावासाने ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

हा निर्णय चीनमधील पासपोर्टधारक तसेच चीनमध्ये अन्य देशांतून स्थायिक झालेल्या सर्व नागरिकांना लागू आहेे. ज्यांना याआधीच ई-व्हिसा दिला असेल, त्यांचा अवधी गोठवण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच ज्या चिनी नागरिकांना अतिमहत्त्वाच्या कारणासाठी भारतात यायचे असेल, त्यांनी प्रथम बीजिंग येथील भारतीय दूतावास किंवा शांघाय येथील वाणिज्य दूतावास यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. चीनमधील करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अन्य देशातील सरकारे चीनमधील आपापल्या नागरिकांना मायदेशात परत आणत आहेत. त्याप्रमाणे भारतानेही चीनमधील भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी एअर इंडियाचे पहिले विमान दोन दिवसांपूर्वी चीनमधील वुहान शहरात पाठवले होते. त्यावेळी ३२४ नागरिकांना भारतात परत आणण्यात आले. रविवारी दुसरे बोईंग ७४७ विमान वुहान शहरात गेले, तेथून करोना व्हायरसने बाधित न झालेल्या ३२३ भारतीय नागरिकांना मायदेशात आणले.

- Advertisement -

मालदीवच्या राष्ट्रपतींनी मानले आभार
एअर इंडियाच्या दुसर्‍या विमानाने ३२३ भारतीय नागरिकांना रविवारी भारतात आणण्यात आले. त्यांच्यासोबत मालदीव देशातील नागरिकांचाही समावेश होता. भारताच्या या मदतीमुळे मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे आभार मानले. ट्विटद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मालदीवचे राष्ट्रपती आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मालदीवच्या ७ नागरिकांना चीनमधील वुहान शहरातून त्वरित बाहेर काढल्याबद्दल मी भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे आभार मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. भारताची ही कृती दोन देशांमधील एक उत्कृष्ट मैत्रीचे आणि सद्भावनेचे चांगले उदाहरण आहे. त्यांच्या ट्विटला उत्तर देताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी मालदीवच्या नागरिकांना वाचवताना ‘शेजारधर्म पाळला’, असे म्हटले.

केरळमध्ये आढळला दुसरा रुग्ण
चीनमधील करोना व्हायरसची जगभरात भीती पसरली आहे. भारतात करोनाचा रविवारी आणखी एक रुग्ण आढळला. केरळमध्ये करोना विषाणूची लागण झालेला हा दुसरा रुग्ण आहे. याआधी चीनमधून परतलेल्या केरळमधील एका विद्यार्थिनीला करोना विषाणूची लागण झाली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी हा दुसरा रुग्ण पहिल्या रुग्णाशी चीनमध्ये संपर्कात होता, असे सांगितले. सध्या या रुग्णाला हॉस्पिटलात स्वतंत्र कक्षामध्ये ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -