घरताज्या घडामोडीसंजय राठोडांच्या राजीनाम्याआधीच वर्षावर बंद दाराआड चर्चा, पण चर्चा फिस्कटताच 'या' मंत्र्याने...

संजय राठोडांच्या राजीनाम्याआधीच वर्षावर बंद दाराआड चर्चा, पण चर्चा फिस्कटताच ‘या’ मंत्र्याने सोडला वर्षा बंगला

Subscribe

संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर शिवसेनेत लॉबिंग झाल्याचे निदर्शनास आले होते, पण अखेर संजय राठोड यांनी नैतिकता दाखवत राजीनामा दिल्याची माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. संजय राठोड आपल्या विरोधात आरोप झाल्याने चौकशी पुर्ण होईपर्यंत पदापासून दूर राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. संजय राठोड यांच्या राजीनाम्यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अनिल परब आणि अनिल देसाई हेदेखील उपस्थितीत होते. संजय राठोड आपल्या पत्नीसह वर्षावर दाखल झाले खरे, पण राजीनामा देण्याआधी मुख्यमंत्र्यांची संजय राठोड यांच्या अनुपस्थित एका नेत्यासोबत बंद दरवाज्याआड बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत संजय राठोड यांच्या बाबतीतला काय नेमका निर्णय घ्यायचा यावर बराच वेळ खलबत झाल्याचे कळते. पण कोणताही मार्ग न निघाल्याने आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी उरलेले काही तास पाहता अखेर मुख्यमंत्र्यांना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला असे कळते. या बैठकीत राजीनामा घ्यावाच लागणार हे ठरल्याने मात्र हा मंत्री बैठकीनंतर लगेचच निघून गेला.

काय घडल बंद दरवाजाआड ?

राज्याच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधक संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी राजीनाम्याची जोरदार मागणी केली. जर राजीनामा दिला नाही तर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही असा ईशारा विरोधी पक्षाकडून देण्यात आला होता. त्यामुळेच दबावात असणाऱ्या महाविकास आघाडीने संजय राठोड यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली. संजय राठोड हे स्वतः राजीनामा घेऊन वर्षा बंगल्यावर पोहचले खरे, पण ते बंगल्यावर असतानाच महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये बंद दरवाजा आड एक बैठक पार पडली. या बैठकीला फक्त दोन जणच हजर होते. बैठकीसाठी खुद्द मुख्यमंत्री तर दुसरी व्यक्ती ती म्हणजे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे. शिवसेनेतील मंत्री असलेल्या राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊ नये यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यामुळेच या प्रकरणात काही दुसरा मार्ग काढता येतो का यासाठीच ही बंद दाराआड चर्चा झाल्याचे कळते. पण राजीनामा घेतला गेला नाही तर त्याचा परिणाम हा अर्थसंकल्पीय अधिवेशनावर होईल याच शंकेने अखेर एकनाथ शिंदे यांची लॉबिंग या संपुर्ण प्रकरणात मागे पडली. म्हणूनच संजय राठोड यांनी राजीनामा देतानाच त्या वर्षा बंगल्यावरून एकनाथ शिंदे तडकाफडकी निघून गेले. त्यांनी माध्यमांशीही बोलण्यासाठी नकार दिला. एकनाथ शिंदे निघाल्यानंतर त्यापाठोपाठच संजय राठोड आपला राजीनामा देऊन वर्षा बंगल्याबाहेर प्रसारमाध्यमांसमोर आले. त्यावेळीही संजय राठोड यांच्यासोबत एकनाथ शिंदे थांबले नव्हते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब तर सोबतच अनिल देसाई हे संजय राठोड यांच्यासोबत होते. खुद्द संजय राठोड यांनीही आपण या दोघांच्या साक्षीनेच राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राजीनामा मी मंजुर केला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. या पत्रकार परिषदेतच संजय राठोड यांचा राजीनामा हा परिवहन मंत्री अनिल परब जाहीरपणे वाचून दाखवला.

- Advertisement -

संजय राठोड यांनी राजीनाम्यात काय म्हटलय ?

माननीय मुख्यमंत्री,
उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य

अत्यंत व्यथित अंत:करणाने हे पत्र मी आपणास लिहित आहे. आपण माझ्या भावना समजून घ्याल, असा विश्वास आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या भोवती दिवंगत पूजा चव्हाण यांच्या मृत्यूचे वादळ घोंगावत आहे. पूजा चव्हाण यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. त्यांच्या मृत्यूची निपक्षपातीपणे तपास व्हावा व सत्य बाहेर यावे अशी माझी ठाम भूमिका आहे. या सर्व प्रकरणाचे राजकीय भांडवल करून राज्यातील विरोध पक्ष माझ्याविरोधात बेछूटपणे आरोप करत आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी ही मोहीम चालवत आहे. या संपुर्ण प्रकरणात दिवंगत पूजा चव्हाण यांच्या कुटुंबाला बदनाम करण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. महाराष्ट्रात अशा खालच्या स्तराचे राजकारण कधीच झाले नव्हते. मी आपल्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून काम करत असलो तरीही, मी एक कडवट शिवसैनिक आहे. आपण माझ्यासारख्या शिवसैनिकाला मंत्रीमंडळात काम दिले यासाठी मी आपला आभारी आहे. पूजा चव्हाण प्रकरणात सत्य बाहेर येईपर्यंत मी मंत्री म्हणून राहणे हे योग्य वाटत नाही. म्हणून मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे.

- Advertisement -

आपला नम्र

संजय राठोड

पूजा चव्हाण – मुख्यमंत्र्यांमध्ये झाली भेट

संजय राठोड यांच्या राजीनाम्या आधीच मुख्यमंत्री आणि पूजा चव्हाणचे कुटुंबीय यांच्यात भेट झाली होती. या भेटीसाठी पूजाचे आई वडील आणि बहीण मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत वनमंत्री संजय राठोड यांना या संपुर्ण प्रकरणात राजकारण करून गोवले जात आहे, असे पटवून देणारे पत्रही देण्यात आले.

पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांचे काय आहे पत्र ?

pooja chavan family letter


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -