असे प्रकार इतर देशातही होतात, पण भारतात…, छेडछाड झालेल्या कोरिअन मुलीची प्रतिक्रिया

mhyochi Hyojeong Park

मुंबई – कोरियन युट्यूबर Hyojeong Park हिला खार परिसरात दोन मुलांनी छेड काढली. ही घटना व्हिडीओच्या माध्यमातून समोर येताच, पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत संबंधित मुलांना अटक केली आहे. याप्रकरणी Hyojeong Park हिने समाधान व्यक्त केलं आहे. असे प्रकार इतर देशातही होतात, पण भारतात तत्काळ दखल घेण्यात आली, असं Hyojeong Park म्हणाली.

मिळालेल्या माहितीनुसार, Hyojeong Park मुंबईतील खार परिसरात फिरत होती. तेव्हा तिने लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू केलं होतं. त्यावेळी काही मुलं तिची छेडछाड करत होते. या व्हिडीओमध्ये दोन तरुणांपैकी एकजण तिच्या खूप जवळ आला आणि तिने विरोध करूनही तो तिच्या हाताला पकडून स्कूटरवर बसविण्यासाठी ओढत होता. तसेच ती आली नाही म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला किस करण्याचाही प्रयत्न केला. यावेळी तिने नो, नो असे म्हणत त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला. यावरच हे तरुण थांबले नाहीत तर ती पुढे जात असताना पुन्हा मागून स्कूटर घेऊन आले आणि तिला आम्ही सोडतो, आमच्यासोबत बस असे सांगू लागले. यावेळी तिने माझे घर इथेच समोर आले असे सांगितले, तरी देखील हे तरुण तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हते.

हेही वाचा – मुंबईत कोरियाच्या युट्यूबर तरुणीची छेडछाड; व्हिडीओ व्हायरल

ही घटना रात्री सुमारे आठच्या दरम्यान घडली. हा लाईव्ह स्ट्रिमिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. अनेकांनी हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाशीही टॅग केला. मुंबई पोलिसांनी लागलीच या प्रकऱणाची दखल घेत आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या एका वाईट घटनेमुळे माझा संपूर्ण प्रवास आणि इतर देशांना अप्रतिम भारत दाखवण्याची माझी आवड मी थांबवणार नाही. माझ्यासोबत दुसऱ्या देशातही असे घडले होते, पण त्यावेळी मी पोलिसांना बोलावून काहीच करू शकले नाही. भारतात मात्र अतिशय वेगाने कारवाई केली जात आहे. मी 3 आठवड्यांहून अधिक काळ मुंबईत आहे, अधिक काळ राहण्याचा विचार करत आहे. अशी प्रतिक्रिया Hyojeong Park हिने दिली.