घरमुंबईपालिका जागेचा अनधिकृतपणे व्यवसायासाठी वापर, कारवाईचा बडगा

पालिका जागेचा अनधिकृतपणे व्यवसायासाठी वापर, कारवाईचा बडगा

Subscribe

चार जणांच्या विरोधात पालिकेने पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे.

मुंबई महापालिकेच्या बोरिवली पश्चिम येथे खेळासाठी आरक्षित भूखंडावर अनधिकृतपणे कब्जा करून तेथे क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यासाठी टर्फ व्यावसायिक तत्वावर चालवून त्याद्वारे पैसे गोळा करणाऱ्या चार जणांच्या विरोधात पालिकेने पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये पालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, सरकारी कारवाईत अडथळा निर्माण करून पालिकेच्या वाहनांचे नुकसान करणे आणि पालिकेच्या जागेवर अनधिकृतपणे ताबा मिळवणे आदी गुन्हे (कलम ३५३, ३३२, ३२३, ३४१, ५०४, ५०६ (२), ४२७, ३४) नोंदविण्यात आले आहेत.

आरोपीचे नाव कुणाल केरकर असून तो आणि त्याचे तीन सहकारी यांच्या विरोधात पालिकेच्या आर/ मध्य विभाग कार्यालयातील उप-अभियंता आनंद आघाव यांनी गुन्हे दाखल केले आहेत. यासंदर्भातील माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बोरिवली (प.) नगर भूमापन क्रमांक ४/१२ (भाग), साईबाबा नगर, कांदिवली गाव या ठिकाणी पालिकेच्या मालकीच्या जागेवर कुणाल केरकर या व्यक्तीने जबरदस्तीने कब्जा करून त्यावर क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी टर्फ उभारले होते. सदर जागा भाड्याने देऊन व त्याचा व्यावसायिक वापर केल्याची तक्रार पालिकेकडे आली. त्यावर उप-अभियंता आनंद आघाव यांनी एक जेसीबी व काही कामगार यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी कारवाई सुरू केली.

- Advertisement -

कुणालने मात्र सदर जागेवर आपला ताबा असल्याचे सांगत पालिका कर्मचारी, अधिकारी यांना दमदाटी देत, शिवीगाळ करत काही प्रमाणात मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे पालिकेच्या जेसीबीवर आणि कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर हातोडा मारून त्याचे नुकसान केले, अशी तक्रार उप-अभियंता आघाव यांनी स्थानिक पोलिसांकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -