Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर आतल्या बातम्या शरद पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांनी घेतली बैठक; राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोरबैठका सुरू

शरद पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांनी घेतली बैठक; राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोरबैठका सुरू

सह्याद्री गेस्टहाऊसमध्ये निवडक कॅबिनेट मंत्र्यांची बैठकीला हजेरी, भेटीगाठीनंतर राष्ट्रवादीचे पॉवरफुल्ल नेते लागले कामाला

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे सर्व मंत्री, खासदारांची १ जून रोजी मुंबईत बैठक घेतल्यानंतर आता पवार यांचे हनुमान समजले जाणारे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल कामाला लागले आहेत. मुंबईत गुरूवारी संध्याकाळी काही मोजक्या निवडक विश्वासू मंत्र्यांसोबत पटेल यांनी गुप्तगू केल्याची खात्रीलायक माहिती आहे. शरद पवार यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. विशेष म्हणजे मुंबईत असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांना या बैठकीची कल्पनाही नव्हती. पक्षाच्या अशा बैठका होत असतात, मात्र अधिकृतरित्या कोणीही या बैठकीबद्दल भाष्य केले नाही.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या दिवसभरातील बैठका आटोपल्यानंतर संध्याकाळी सह्याद्री गेस्टहाऊसवर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीला काही निवडक मंत्र्यांनाच बोलावले होते, अशी माहिती दै. आपलं महानगरला मिळाली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी बोलविलेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार सुनिल तटकरे यांची विशेष उपस्थिती होती.

- Advertisement -

मुंबईत असूनही पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिका, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे या बैठकीला उपस्थित नसल्याचे समजते. पटेल यांनी घेतलेल्या पक्षाच्या निवडक नेत्यांच्या बैठकीची कल्पना अनेकांना नव्हती, त्यामुळेच एखाद्या महत्वाच्या विषयावर बैठक घेतल्याने आता आगामी काळात पक्षाची रणनिती ठरवली जाण्याची शक्यता आहे.

सध्या मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचे आरक्षण, ओबीसींचे आरक्षण आणि मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने सर्वच समाजातील घटक ठाकरे सरकारवर नाराज आहेत. तर ओबीसींचे आरक्षण आणि मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण या विषयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमने -सामने आली आहे. सरकारच्या दीड वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा देण्याची भाषा केली आहे. काँग्रेसचे हायकमांड, अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागासवर्गीय आणि ओबीसींचे संरक्षण केले पाहिजे, असे पत्र पाठवले होते. मात्र, या पत्राची दखलही मुख्यमंत्री ठाकरे यांनी न घेतल्याने काँग्रेसचे काही मंत्रीही नाराज आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी बोलावलेल्या निवडक मंत्र्यांची बैठक सरकारमध्ये, सारे काही आलबेल नाही, हे सांगण्यास पुरेसे आहे.

- Advertisement -

या आठवड्याच्या सुरुवातीलाच, सोमवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी सुमारे अर्धा तास भेट घेतली. त्यावेळी ही केवळ सदीच्छा भेट असल्याचे सांगत, फडणवीस यांनी भेटीचा फोटो ट्विट केला होता. त्यानंतर भेटीची माहिती मीडियाला मिळाली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विरोधी पक्षनेत्याच्या दररोजच्या कार्यक्रमात या सदिच्छा भेटीचा उल्लेखही नव्हता. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी फडणवीस यांनी जळगावमध्ये मुक्ताईनगरच्या एकनाथ खडसेंच्या घरी हजेरी लावून पक्ष कार्य वाढवण्यासाठी भाजपच्या खासदार रक्षा खडसेंशी चर्चा केली.

त्याचवेळी भुसावळचे भाजप आमदार संजय सावकरे यांच्या फोनवरून फडणवीस आणि खडसे यांच्यामध्ये बोलणे झाल्याची माहिती मिळते आहे. भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या खडसेंचे पहिल्यांदाच फडणवीस यांच्याशी बोलणे झाले हे विशेष. भाजप सोडताना खडसे यांनी फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत पक्ष सोडला होता. मात्र पवार यांच्याशी भेट झाल्यानंतर फडणवीस आणि खडसे हे पहिल्यांदाच बोलले असे आता सांगण्यात येत आहे.

त्यानंतर दुसर्‍याच दिवशी एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी सिल्व्हर ओकवर भेटण्यासाठी गेले होते. खडसे यांचीही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याचवेळी मूळचे राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री झालेले उदय सामंत यांची हजेरी लक्षात येण्यासारखी आहे. आजारपणातून बरे झाल्यानंतर फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही त्यांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर गेले नाहीत. उलट शरद पवार यांनीच मुख्यमंत्री ठाकरे यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली होती.

- Advertisement -