घरक्राइमपंतप्रधान दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर ऑल आऊट ऑपरेशन; २८ फरार आरोपींवर पोलिसांकडून कारवाई

पंतप्रधान दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर ऑल आऊट ऑपरेशन; २८ फरार आरोपींवर पोलिसांकडून कारवाई

Subscribe

शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. याच पार्श्‍वभूमीवर मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांनी रात्री 11 वाजता अचानक ऑल आऊट ऑपरेशन मोहीम सुरू केली होती

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी मुंबई दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांनी मंगळवारी अचानक ऑल आऊट ऑपरेशन मोहीम हाती घेतली होती. या कारवाईत 28 फरार आणि हवे असलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. 233 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले, तर 8 हजार168 वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी 5 हजार 747 वाहनचालकांविरुद्ध विविध कलमांतर्गत तर ड्रंक अँड ड्राइव्हप्रकरणी 15 जणांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौर्‍यावर येत आहेत.

शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. याच पार्श्‍वभूमीवर मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांनी रात्री 11 वाजता अचानक ऑल आऊट ऑपरेशन मोहीम सुरू केली होती. रात्री तीन वाजेपर्यंत ते ऑपरेशन सुरू होती. यावेळी पाच प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, चौदा पोलीस उपायुक्त, 28 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 93 पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपल्या हद्दीत विशेष मोहीम हाती घेतली होती. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पोलीस ठाणे, नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशदरम्यान विविध ठिकाणी भेट देऊन पोलिसांचे मार्गदर्शन केले.

- Advertisement -

या कारवाईदरम्यान पोलिसांकडून 233 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते, त्यात काही अभिलेखावरील गुन्हेगार तपासण्यात आले, यावेळी पोलिसांनी 28 विविध गुन्ह्यांत फरार आणि पाहिजे आरोपींना अटक केली तर 95 अजामीनपात्र वॉरंट बजावणी करून त्यांच्यावर कारवाई केली. ड्रग्ज खरेदी करणारे, ड्रग्जचे सेवन करणार्‍या 149 जणांवर कारवाई केली. अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी 35 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडील शस्त्रे जप्त करण्यात आले. सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत 233 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले, त्यात अभिलेखावरील 787 रेकॉर्डवरील आरोपी तपासण्यात आले तर 28 आरोपी मिळून आले. त्यांच्या योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत 100 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यात 8 हजार 168 दुचाकी आणि चारचाकी वाहने तपासण्यात आलीत, यावेळी मोटार वाहन कायदा कलमांतर्गत 5 हजार 747 चालकांवर कारवाई करण्यात आली. कलम 185 अन्वये 15 वाहनचालकाविरुद्ध ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने 1 हजार 113 हॉटेल, लॉजेस आणि मुसाफिर खाने तपासण्यात आले. अवैध दारूविक्री, जुगार आदी 41 ठिकाणी छापे टाकून अवैध धंदे समूळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यात 68 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. मर्मस्थळे आणि संवेदनशील असे 671 ठिकाणांची तपासणी करण्यात आले. महाराष्ट्र-मुंबई पोलीस कायदा कलम 142, 120, 122, 135 कलमांतर्गत एकूण 173 जणांवर कारवाई करण्यात आली. मुंबई शहरातून तडीपार केलेले, मात्र तडीपारीच्या आदेशाचे उल्लघंन करून मुंबई शहरात वास्तव्यास असलेल्या काही तडीपार गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -