Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई अर्णबसाठी रात्रीच लागली होती फिल्डिंग

अर्णबसाठी रात्रीच लागली होती फिल्डिंग

Related Story

- Advertisement -

‘रिपब्लिक भारत’ आणि ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनींचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी मुंबई आणि रायगड पोलिसांची रात्रीच फिल्डिंग लागली होती. अर्णबला याची तसूभरही कल्पना नव्हती. पहाटे साडेपाचच्या सुमारास रायगड पोलिसांनी अर्णबला वरळी येथील त्याच्या घरातून ताब्यात घेऊन रायगड पोलिसांचे पथक अलिबागला रवाना झाले. रायगड पोलिसांचे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह २ पोलीस उपअधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांच्यासह १५ जणांचे रायगड पोलिसांचे पथक आणि मुंबई गुन्हे शाखेचे दोन पथके आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी असा एकूण ३५ ते ४० जणांचा असा ताफा या कारवाईत सामील होता.

मुंबईतील वास्तूविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अर्णब गोस्वामी यांना बुधवारी रायगड पोलिसांनी अटक केली आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना लक्ष्य करणाऱ्या रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी हे प्रसिद्धीच्या झोकात आले होते.

- Advertisement -

मुंबई पोलीसानी नुकतीच टीआरपी घोटाळा केस उघडकीस आणून रिपब्लिक भारत वाहिनीचे संपादक यांना नोटीस पाठवण्यात आली होती. दरम्यान रायगड येथील अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अन्वय नाईक प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी सुरु करण्यात आली. चौकशीत अर्णब गोस्वामी हा दोषी आढळून येताच अर्णबच्या अटकेसाठी आठवड्याभरापूर्वीच रायगड पोलिसांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली होती. अर्णबच्या अटकेची खबर लागू नये म्हणून रायगड पोलिसांनी विशेष दक्षता घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपधीक्षकासह १५ ते १६ जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.

अर्णब मुंबईतील वरळी येथे राहत असल्यामुळे रायगड पोलिसांनी मुंबई पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले. मुंबई पोलीस आयुक्तांनी गुप्तवार्ता पथकाचे प्रमुख सचिन वाझे यांचे पथक मदतीसाठी रायगड पोलिसाना दिले. रायगड पोलिसांच्या विशेष पथकातील काही अधिकारी मागील दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसले होते. हे अधिकारी अर्णबच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते, बुधवारी पहाटे अर्णबला अटक करायची हे ठरल्यानंतर रायगड पोलिसांच्या विशेष पथकातील अधिकारी तसेच महिला अधिकारी मंगळवारीच मुंबईत दाखल झाले. मुंबईतील गुन्हे शाखा कक्ष ३ तसेच गुप्तवार्ता युनिट (सीआययु) चे अधिकारी आणि अंमलदार यांनी रात्रीपासूनच अर्णबच्या घरावर पाळत ठेवली होती. चुकून अर्णबला अटकेची कुणकुण लागली तर अर्णब पळून जाईल म्हणून ही दक्षता पोलिसांकडून घेण्यात आली होती. ना.म. जोशी मार्ग या स्थानिक पोलिसांना देखील रात्री कल्पना न देता पहाटे अर्णबच्या घराजवळ बंदोबस्त वाढवण्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रायगड पोलिसांचे पथक अर्णबच्या घरी दाखल झाले, एवढ्या सकाळी कोण आले म्हणून अर्णबच्या पत्नीने दाराच्या भिंगेतून बघितले आणि पोलीस आल्याची माहिती झोपेत असलेल्या अर्णबला देण्यात आली. प्रथम आपल्याला टीआरपी प्रकरणात अटक करण्यासाठी आले असे समजून अर्णब यांनी टीआरपी प्रकरणातील तपास अधिकारी यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अर्नबने आणखी काही जणांना फोन लावले. रायगड पोलिसांनी दार उघडा म्हणून दटावून सांगितल्यावर अर्णबने दार उघडले. एकापाठोपाठ एक असे दहा ते बारा जणांचे पोलीस पथक अर्णबच्या घरात घुसून तुम्हाला आमच्यासोबत यावे लागेल असे सांगितले. मात्र अर्णबने त्याला विरोध करून आरडाओरड करण्यास सुरुवात केली. रायगड पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र अर्णब काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर पोलिसांनी अर्णबला ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले. आणि काही वेळातच रायगड पोलिसांचे पथक रायगडच्या दिशेने रवाना झाले

काय आहे अन्वय नाईक प्रकरण

५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग काविर येथील फार्महाऊसवर गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच वेळी अन्वय यांची आई कुमुद नाईक (८४) यांचाही मृतदेह फार्महाऊसवर मिळून आला होता. अन्वय यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करते. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वय यांनी मागितले होते. मात्र, अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा ते देण्यास टाळाटाळ करत होते, तर दुसरकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून माल उचलला होता त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता, परंतु समोरून पैसे येत नसल्याने अन्वय यांनी नैराश्यतुन आत्महत्या केली, असा आरोप करत पत्नी अक्षता नाईक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी अर्णब गोस्वामीसह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.


हेही वाचा – अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक


 

- Advertisement -