किरकोळ कारणावरून कामगाराची हत्या

सुकलेल्या कपड्यावर ओले कपडे टाकले

सुकलेल्या कपड्यांवर साथीदार कामगाराने ओले कपडे वाळत टाकल्याच्या वादातून 18 वर्षीय कामगाराने 17 वर्षीय सहकारी कामगाराची जमिनीवर डोके आपटून हत्या केल्याची घटना अरिहंत कंपाऊंड, पूर्णा येथे रविवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली.

विरेश तिरुपती पवार (17) असे हत्या झालेल्या अल्पवयीन कामगाराचे नाव आहे. तो तस्वीन कँटीनमध्ये वेटरचे काम करून कँटीनच्या दुसर्‍या माळ्यावर सहकारी कामगारांसोबत राहत होता. त्याचा सहकारी कामगार सुमनकुमार बेचन पासवान (18) याने दोरीवर त्याचे कपडे सुकत ठेवले होते. त्याचे कपडे सुकले होते. त्याचवेळी विरेश याने ओले कपडे त्याच्या कपड्यांवर टाकले. त्याचा राग आल्याने सुमनकुमार याने शिवीगाळ करीत विरेश याला कपडे बाजूला करण्यास सांगितले. मात्र, त्याने कपडे बाजूला करण्यास नकार दिला. त्यावरून चिडलेल्या सुमनकुमार याने शिवीगाळ करीत विरेशला बेदम मारहाण करून त्याला खाली पाडून डोके लादीवर आपटून त्याची हत्या केली.

यावेळी विरेश याचा चुलत भाऊ अनू मुकेश पवार याने याबाबतची माहिती कँटीन मालकास दिल्याने त्याने नारपोली पोलीस ठाण्याला कळवले. एपीआय विष्णू आव्हाड यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन हत्येचा गुन्हा दाखल केला आणि सुमनकुमार पासवान याला अटक केली. त्याला भिवंडी न्यायालयात हजर केले असता 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.