घरमुंबईअविघ्न पार्क टॉवरमध्ये भीषण आग; एकाचा मृत्यू; आगीची चौकशी करण्याचे आदेश

अविघ्न पार्क टॉवरमध्ये भीषण आग; एकाचा मृत्यू; आगीची चौकशी करण्याचे आदेश

Subscribe

करी रोड येथील तळमजला अधिक ६० मजली ‘अविघ्न पार्क’ टॉवर (बी विंग) मध्ये १९ व्या मजल्यावर शुक्रवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत १९ व्या मजल्यावर अडकलेला अरुण तिवारी (३०) हा सुरक्षारक्षक स्वतःचा जीव वाचविण्याच्या धडपडीत खाली पडला आणि जबर जखमी झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सुदैवाने, या टॉवरमधील २६ रहिवाशी बचावले गेले. अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती. दरम्यान, पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, सदर आगीच्या घटनेची चौकशी करण्याचे व दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे ज्यावेळी १९ व्या मजल्यावरून अरुण तिवारी ही व्यक्ती खाली पडली त्यावेळी महापौर किशोरी पेडणेकर खालील भागात उपस्थित होत्या.

- Advertisement -

या दुर्घटनेनंतर, पर्यटन, पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व दुर्घटनेबाबत माहिती जाणून घेत पुन्हा महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, करी रोड रेल्वे स्थानकानजीक असलेल्या तळमजला अधिक ६० मजली ‘ अविघ्न पार्क’ उंच टॉवरमध्ये १९ व्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास एका फ्लॅटमध्ये लाकडी फर्निचरचे काम सुरू असताना शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडल्याचे समजते. ही आग ज्या फ्लॅटमध्ये लागली त्या फ्लॅटमध्ये चार जणांचे कुटुंब राहत होते. घरातील कर्ता व्यक्ती नोकरीसाठी घराबाहेर गेली होती व त्याची पत्नी आणि दोन मुले हे काही अनर्थ घडण्यापूर्वीच लगेच इमारतीबाहेर सुखरूप पडल्याने ते थोडक्यात वाचले.
दरम्यान, ही आग काही वेळातच हळूहळू भडकली. दुपारी १२.१३ वाजता आग आणखीन भडकली व स्तर -३ ची झाली. त्यानंतर आगीने आणखीन भीषण रूप धारण केल्याने दुपारी १२.४४ वाजताच्या सुमारास आगीचा स्तर -४ झाला होता.

- Advertisement -

या आगीबाबत माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याला सुरुवात केली. तत्पूर्वीच, या टॉवरमधील २६ रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. त्यापैकी १६ जणांना अग्निशमन दलाने शिडीच्या साहाय्याने बाहेर काढल्याचे समजते. त्यामुळे हे रहिवाशी थोडक्यात बचावले. अन्यथा मोठी जीवित व वित्तीय हानी झाली असती.

अग्निशमन दलाने, १४ फायर इंजिन, ९ जम्बो टँकर, हायड्रोलिक पंप आणि ९० मीटर उंचीच्या शिडीच्या सहाय्याने बचावकार्य केले व आगीवर काही तासातच नियंत्रण मिळवले.

महापौरांसमोरच ‘त्याचा’ दुर्दैवी मृत्यू

अविघ्न पार्कच्या १९ व्या मजल्यावर ज्यावेळी आग लागून आग आणि धूर २१ व्या मजल्यापर्यंत पोहोचला त्यावेळी ड्युटीवर तैनात असलेला सुरक्षारक्षक अरुण तिवारी (३०) हा ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी कोणी अडकले आहे का, हे पाहण्यासाठी लिफ्टने घाईघाईने १९ व्या मजल्यावर गेला होता. मात्र त्यावेळी त्या इमारतीत कोणीही नव्हते.

दुर्दैवाने अरुण तिवारी हा त्या आगीमुळे अडकला. त्यानंतर त्याने १९ मजल्याच्या खिडकीच्या भागातून बाहेर पडून स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. दुर्दैवाने तो त्या मजल्याच्या सज्जला पकडून लटकला. तोपर्यंत त्याला वाचविण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत तातडीने आली नाही. त्यामुळे फार वेळ त्याला त्या ठिकाणी थांबता आले नाही व स्वतःला वाचविता आले नाही. अखेर, त्याचे हात सटकले आणि तो एवढया उंचावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आगीच्या घटनेची चौकशी व कारवाई करणार – आयुक्त

या इमारतीला आग लागल्याची व त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. या इमारतीचे ‘फायर ऑडिट’ झाले होते का, फायर यंत्रणा काम करत होती का, इमारतीला ओसी होती का याची चौकशी करण्यात येणार आहे. सदर चौकशीत जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे.

दोषी असतील त्यांच्यावर कारवाई – महापौर

अविघ्न पार्कमधील आगीच्या घटनेची पाहणी करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, कोणालाही पाठीशी न घालता बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. त्यानुसार या दुर्घटनेची सखोल चौकशी करून त्यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर पालिका, अग्निशमन दल कारवाई करेल आणि पोलिसांकडूनही याची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

तत्पूर्वी, सदर इमारतीमधील रहिवाशांनी तेथील अनधिकृत कामांबाबत काही तक्रारी महापौरांकडे केल्या. तसेच सोसायटी गठीत करून दोन वर्षे झाली तरी अद्याप पाणी नसल्याची तक्रारही रहिवाशांनी केली. त्यावर महापौरांनी वरीलप्रमाणे आपले उत्तर दिले.

या आगीच्या घटनेप्रसंगी इमारतीमधील सुरक्षारक्षक अरुण तिवारी याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने महापौरांनी खेद व दुःख व्यक्त केले. अग्निदलाचे जवान त्याला वाचविण्यासाठी मोठी शिडी लावून तयारी करीत असतानाच अरुण तिवारी ही व्यक्ती वरतून खाली पडला, असे महापौरांनी आयुक्त इकबाल चहल यांना सांगितले. तसेच, जर सुरक्षारक्षकांना आपत्कालीन प्रशिक्षण दिले गेले असते, तर तो वरतून खाली पडला नसता व त्यात त्याचा जीव गेला नसता, असे महापौर पेडणेकर यांनी सांगितले.

मी त्या वेळी १९ व्या मजल्यावरच एका घरात घरकाम करीत होतो. त्यावेळी अचानक मोठा धूर आल्याने घाबरलो. त्यामुळे तातडीने बाहेर धाव घेऊन जिन्याने खाली आलो. त्यामुळे सुदैवाने माझा जीव वाचला.
राकेश महतो, घरकाम कामगार मुलगा
आम्ही वर्षभरापासून या ठिकाणी २० व्या मजल्यावर राहत आहोत. मात्र आज दुपारी १९ व्या मजल्यावर लागलेल्या आगीच्या ज्वाला आमच्या मजल्यावर आल्या. त्यामुळे आम्ही घाबरलो व लगेच जिन्यानेच खाली उतरलो.
मांगीलाल जैन, रहिवासी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -