घरमुंबईबालनाट्याचा जल्लोष पाहून मनस्वी आनंद झाला - महापौर नरेश म्हस्के

बालनाट्याचा जल्लोष पाहून मनस्वी आनंद झाला – महापौर नरेश म्हस्के

Subscribe

बालकलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतानाच मुलांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादाचे कौतुक करीत पुढील वर्षी हा महोत्सव तीन दिवस करण्यात येईल, अशी घोषणा महापौरांनी यावेळी केली.

एकापेक्षा एक बालनाट्य.. कधी ज्ञानाची शिदोरी उघडणारी तर कधी हास्याचे फवारे उडविणारे, कधी चेटकीण.. राक्षस यांची भीती तर कधी राजा, परी,‍ जीनी, मिक्की माऊस अशा बच्चेकंपनीच्या जगातील लोकप्रिय पात्राची रेलचेल असणारी.. त्यातून मुलांची वाढती उत्कंठा.. कधी टाळ्या.. कधी हशा अशी गम्माडी गम्मत आणि जम्माडी जम्मत करीत, जेवणासाठी शिस्तबद्ध रांग लावत दोन दिवस गडकरी रंगायतनमध्ये बालरसिकांनी खऱ्या अर्थाने बालनाट्याचा जल्लोष साजरा केला. हे पाहून मनस्वी आनंद झाला, अशा शब्दांत महापौर नरेश म्हस्के यांनी बालनाट्य महोत्सवाच्या समारोपप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच सर्व बालकलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतानाच मुलांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादाचे कौतुक करीत पुढील वर्षी हा महोत्सव तीन दिवस करण्यात येईल, अशीही घोषणा महापौरांनी यावेळी केली.

दरवर्षी बालनाट्य महोत्सवाचे आयोजन

ठाणे महानगरपालिका आयोजित ठाणे महापौरचषक अंतर्गत बालनाट्य महोत्सव गडकरी रंगायतनमध्ये बुधवारपासून मोठ्या उत्साहात सुरू आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बच्चेकंपनीने रंगातयनमध्ये मोठी गर्दी केली. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजल्यापासून बालप्रेक्षकांनी रंगायतनचे आवार गर्दीने फुलून गेले. ठाणे शहरातील बालकलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, व रंगमंचावर आपली कला सादर करता यावी यासाठी दरवर्षी हा बालनाट्य महोत्सव साजरा केला जातो. परंतु यावर्षी बालनाट्य पाहण्यासाठी बालरसिक यावेत, यासाठी महापौरांनी स्वत: लक्ष घालून महापालिका शाळांमधील विद्यार्थी व खाजगी शाळांना निमंत्रित केले.‍ सर्व शाळांनीही महापौरांच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद देत रंगायतन हाऊसफुल्ल केल्याची प्रचिती दोन दिवस पाहायला मिळाली.

- Advertisement -

पुढील वर्षी मनपा शाळेची मुलेही सहभागी होतील

गेले दोन दिवस सकाळपासून आलेल्या सर्व बालप्रेक्षकांसाठी रंगायतनमध्ये भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचीही पाहणी स्वत: महापौर यांनी केली. या महोत्सवाला आलेल्या पालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने बाल रसिकांनी दोन दिवस धम्माल करीत खऱ्या अर्थाने या बालनाट्य महोत्सवाला मूर्त स्वरुप दिले, असे मतही यावेळी महापौरांनी व्यक्त केले. तसेच पुढील वर्षी महापालिकेच्या शाळाही या महोत्सवात सहभागी होतील असे सूतोवाचही त्यांनी यावेळी केली.

या बालनाट्याचे सादरीकरण

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ब्राह्मण शिक्षण मंडळ या शाळेचे डरांव डरांव, आर्टिस्ट प्लॅनेट, ठाणेचे अल्लादिन आणि जादूई जीन, ज्ञानदीप कलामंच, ठाणेचे खिचडी, साईस्पर्श ठाणेचे मुले देवाघरची फुले, आदित्य प्रतिष्ठान, ठाणे राजा जो जो रे, अभिव्यक्ती फाऊंडेशनचे तोरणा, मुक्तछंद नाट्यसंस्था, ठाणेचे चिमणी उडाली भुर्रर ही बालनाट्ये सादर करण्यात आली.

- Advertisement -

बालकलाकारांना भेटवस्तूंचे वाटप

या महोत्सवाच्या समारोपावेळी बालनाट्यात सहभागी झालेल्या संस्थांचा महापालिकेच्या वतीने मानधन देवून महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शिक्षण समितीच्या गट अधिकारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल महापौरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच दोन दिवस मुलांना शिस्तबद्ध पद्धतीने हाताळणाऱ्या महापालिकेच्या स्काऊट गाईडच्या शिक्षिका गीता तांबट यांना देखील महापौरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच महोत्सवाच्या समारोप प्रसंगी उपस्थित सर्व बालकलाकांराना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले.

बेघर निराधार मुलांचाही परफॉर्मन्स

बालनाट्य महोत्सवात ठाणे महानगरपालिका, रेल्वे पोलीस गुन्हे शाखा व रेनबो फाउंडेशन यांच्या माध्यमातून बाल स्नेहालय या संस्थेने आबासाहेब मला काहीतरी सांगायचं आहे, हे बालनाट्य सादर केले होते. यातील मुले ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारी निराधार, बेघर व अनाथ, सिग्नल शाळेची असल्याने त्यांचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आले.

खूपच मज्जा आली

आम्ही खूप मज्जा केली. सगळी नाटकं आम्हाला खूप आवडली. तसेच आम्ही खूप हसलो, अशी प्रतिक्रिया लोपा तळेगांवकर या विद्यार्थिनीने व्यक्त केली. तसेच एकाच वेळी वेगवेगळी नाटके पाहायला मिळाली. प्राणी, पक्षी, जादूची परी अशी सर्वच नाटकं आम्ही दोन दिवस पाहिली. नाटकांत काम करणारी छोटी मुले पाहून आम्हालाही यात काम करायचंय असं वाटू लागलंय. पण आम्ही खूपच मज्जा केली असल्याची प्रतिक्रिया शौर्य बसवंत या मुलाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -