घरमुंबईवांद्रे स्कायवॉकचे काम रखडणार

वांद्रे स्कायवॉकचे काम रखडणार

Subscribe

वांद्रे येथील स्कायवॉकच्या कामात आणखी दिरंगाई होणार असल्याचे संकेत आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी पश्चिम द्रुतगती मार्गावर ब्लॉक घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ला अद्यापही परवानगी दिलेली नाही. त्यामुळेच आता स्कायवॉकचे काम रखडणार असल्याची माहिती आहे. बीकेसी कनेक्टर ब्रीजसाठी एमएमआरडीएला सध्याच्या स्कायवॉकचा काही भाग हा तोडण्याची गरज आहे. त्यामुळेच वांद्रे स्थानक ते बीकेसीला जोडणार्‍या स्कायवॉकचा काही भाग हा बंद ठेवण्यात आला आहे. २४ जूनपर्यंत स्कायवॉकचे काम पूर्ण करणार असल्याचे एमएमआरडीएने याआधीच जाहीर केले आहे.

स्कायवॉकच्या कामाच्या टप्प्यात महत्वाचे काम हे पश्चिम द्रुतगती मार्गावर होणार आहे. अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर हे स्कायवॉकचा भाग हटवण्याचे काम चालणार आहे. या कामासाठी एमएमआरडीएमार्फत वाहतूक पोलिसांकडे ब्लॉक घेण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी सध्या स्कायवॉकच्या कामासाठी ब्लॉक देण्यासाठी नकारघंटा वाजवली आहे. वांद्रे स्कायवॉकपासून काही अंतरावर दुसर्‍या एका प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या स्कायवॉकच्या कामासाठी ब्लॉक घेण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही असे वाहतूक विभागाचे म्हणणे आहे. एमएमआरडीला स्कायवॉकच्या कामाअंतर्गत क्रेनचा वापर करून स्कायवॉकचा भाग कापून काढायचा आहे. त्यासाठीच दोनवेळा पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळवण्याची वेळ वाहतूक विभागावर येणार आहे. या कामासाठी एकूण दोन ब्लॉक घेण्यात येणार आहेत. दोन्ही ब्लॉक हे रात्रीच्या वेळेत घ्यावे लागतील असे एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. पण ब्लॉक घेण्यासाठी वाहतूक विभागाकडून योग्य प्रतिसाद मिळालेला नाही. ब्लॉक मिळाल्यास हे काम दोन दिवसात पूर्ण करण्यात येईल, असे एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने फ्लायओव्हरच्या कामासाठी २५ मार्चपासून स्कायवॉकचा काही भाग बंद राहील अशी माहिती जाहीर केली होती. २४ जूनपर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे एमएमआरडीएने याआधीच जाहीर सूचनेद्वारे स्पष्ट केले आहे. एसआरए कार्यालय ते पश्चिम एक्सप्रेस हायवेला जोडणारे नंदादीप गार्डनचा भाग या दरम्यानचा स्कायवॉकचा भाग वापरता येणार नाही असे एमएमआरडीएने स्पष्ट केले होते. पण त्याआधीच हा संपूर्ण स्कायवॉक बंद करण्यात आला आहे.

असे होणार काम
मेट्रो २ बी आणि बीकेसी फ्लायओव्हर या दोन्ही प्रकल्पांमुळे सध्याचा स्कायवॉकच्या काही भागावर हातोडा मारण्याची वेळ मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणावर आली आहे. पण नव्या रचनेनुसार पादचार्‍यांची एरव्हीची मोठी फेरी कमी होणार आहे. मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (एसआरए) च्या मुख्यालयापासून ते नंदादीप गार्डन बीकेसी दरम्यानचा १०० मीटरच्या भागावर एमएमआरडीएमार्फत हातोडा मारण्यात येणार आहे. स्कायवॉकचा हा भाग फ्लायओव्हर आणि मेट्रोच्या कामादरम्यान येत आहे. त्यामुळेच नव्या फ्लायओव्हरसाठीची रचना करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -