घरमुंबईटाकाऊ वस्तूंपासून साकारली बाप्पाची आकर्षक रुपे !

टाकाऊ वस्तूंपासून साकारली बाप्पाची आकर्षक रुपे !

Subscribe

कर्णबधीर विद्यार्थ्यांचा नेत्रदीपक कलाविष्कार

जगात टाकावू काहीच नसते, फक्त त्याचा योग्य उपयोग करायला हवा, असा संदेश टाकावू वस्तूंपासून गणेशाची विविध रुपे साकारून चेंबूरच्या थडाणी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी दिला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळांमधून विद्यार्थ्यांना मातीपासून गणपती साकारण्यास शिकवले जाते. चेंबूरमधील रोचिराम टी. थडाणी हायस्कूल फॉर हिअरिंग हँडीकॅप शाळेतील विद्यार्थ्यांनी मातीऐवजी टाकऊ वस्तूंपासून बाप्पाची आकर्षक रुपे साकारली आहेत. 64 कलांचा स्वामी असलेल्या बाप्पाची कर्णबधीर विद्यार्थ्यांनी साकारलेली पर्यावरणस्नेही रुपे पाहून लोक अचंबित होत आहेत.

बाप्पाच्या आगमनाची सर्वजण उत्सुकतेने वाट बघत असतात. त्याच्या स्वागताची जोरदार तयारी सध्या सर्वत्र सुरू आहे. यामध्ये बाप्पाची मूर्ती साकारण्यापासून ते त्याची आरास बनवण्यामध्ये बच्चे कंपनीच नेहमीच पुढे असते. विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची किंवा हस्तकलेची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणरायाची रुपे साकारण्यास सांगितले जाते. त्यामध्ये विद्यार्थी समरसून भाग घेतात व त्यांच्या छोट्या हातांनी बाप्पाची प्रतिकृती साकारली जाते. चेंबूरमधील रोचिराम टी. थडाणी हायस्कूल फॉर हिअरिंग हँडीकॅप शाळेतील कर्णबधीर विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे नव्या रुपातील व नव्या ढंगातील बाप्पाची रुपे साकारली आहेत.

- Advertisement -

गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्याऐवजी प्रत्येक महिन्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी या उद्देशाने थडाणी हायस्कूलमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. त्यानुसार ऑगस्टमध्ये शाळेत राबवलेल्या स्वच्छता मोहीमेमध्ये विद्यार्थ्यांनी फिनाईल बाटली, तेलाचा कॅन, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या अशा अनेक टाकाऊ वस्तू जमा केल्या होत्या. या टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर करावा या उद्देशाने शाळेच्या कला शिक्षक मेघना सोपारकर व छाया केणी यांनी सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले.

त्यातूनच सप्टेंबरमध्ये येणार्‍या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विद्यार्थ्यांकडून गणरायाच्या प्रतिकृती साकारण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून शुक्रवारी विद्यार्थ्यांनी बाप्पाची नव्या रुपातील व नव्या ढंगातील आकर्षक अशी विविध रुपे साकारली. फिनाईलच्या बाटली, तेलाचा कॅन, लोकर, प्लास्टिकच्या वस्तू यापासून कर्णबधीर विद्यार्थ्यांनी बाप्पाच्या प्रतिकृती साकारल्या. तसेच पर्यावरणाची वाचवा असा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी झाडांच्या पानापासूनही बाप्पाची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. विद्यार्थ्यांनी साकारलेली ही रुपे आकर्षक व मोहक असल्याने पाहणार्‍यांनाही त्याची भूरळ पडत आहे.

- Advertisement -

कर्णबधीर विद्यार्थ्यांना उत्तेजन व प्रोत्साहन दिले तर ते चांगले काम करतात. त्यासाठी आम्ही शाळेत विविध उपक्रम राबवत असतो. त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यातूनच आम्ही हा उपक्रम राबवला.
– भाग्यश्री वर्तक, वरिष्ठ शिक्षिका, रोचिराम टी. थडाणी हायस्कूल फॉर हिअरिंग हँडीकॅप, चेंबूर

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -