घरमुंबई९ दिवसांनंतर अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे! मुंबईकर सुटले!

९ दिवसांनंतर अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे! मुंबईकर सुटले!

Subscribe

गेल्या ८ दिवसांपासून सुरू असलेला बेस्टचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर संपकरी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतल्याचं जाहीर केलं.

गेल्या ८ दिवसांपासून मुंबईकरांना वेठीला धरणारा बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज बुधवारी पुन्हा एकदा सुनावणी झाली. त्यावेळी उच्च न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन चर्चा करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केली. तसेच, संध्याकाळपर्यंत बेस्ट प्रशासनासोबत या कर्मचाऱ्यांची बोलणी होणार आहेत. दरम्यान, तब्बल ८ दिवसांनंतर बेस्ट कर्मचारी कामावर परतणार आहेत. त्यामुळे संध्याकाळपर्यंत बेस्ट बसेस पुन्हा मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत.

मध्यस्थ ३ महिन्यांत पूर्ण करणार चर्चा!

बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबई उच्च न्यायालयात बेस्ट संपाबाबत सुनावणी सुरू झाली. यावेळी न्यायालयाने कर्मचारी संघटनांना चर्चा करण्याचं आवाहन केलं. तसेच, तातडीने संप मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत संप मिटल्याचं जाहीर केलं. मात्र, त्याचबरोबर मागण्यांवर ठाम असून प्रशासनासोबत चर्चा करण्याची तयारी संघटनांनी केली आहे. प्रशासन आणि कर्मचारी संघटनांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावण्यासाठी न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, संपकऱ्यांना मेस्मा लावून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. मात्र, अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचं आश्वासन राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे.

- Advertisement -
Best Workers
बेस्ट कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला

जानेवारीपासून लागू होणार वेतनवाढ

दरम्यान, येत्या ३ महिन्यांमध्ये मध्यस्थ चर्चेची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. ग्रेड पे १२५० रुपयांनी वाढवून ६६८० रुपये करण्याचं आश्वासन कामगार संघटनांना देण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांनी ग्रेड पेमध्ये २५ रुपयांची वाढ मागितली होती. मात्र, न्यायालयात सुनावणीनंतर १२५० रुपयांच्या वाढीवर कामगार समाधानी आहेत. जानेवारी २०१९पासून नवी वेतनवाढ लागू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला!

गेल्या ८ दिवसांपासून संप सुरू असल्यामुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागला होता. बेस्ट रस्त्यावर उतरत नसल्यामुळे मुंबईकरांना खासगी प्रवासी वाहतुकीची मदत घ्यावी लागत होती. मात्र, यामुळे खासगी टॅक्सी, रिक्षा  किंवा बसेसने अव्वाच्या सव्वा भाडेआकारणी करत मुंबईकरांची लुट चालवली होती. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना या पक्षांनी देखील संपकऱ्यांच्या बाजूने उडी घेत आक्रमक भूमिका मांडायला सुरुवात केली होती. त्यामुळे बुधवारी संप मागे घेतल्यामुळे मुंबईकरांचा जीव मात्र भांड्यात पडला असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -