घरCORONA UPDATEवांद्रे स्थानक गर्दी: आपले अपयश केंद्रावर ढकलू नका - फडणवीस

वांद्रे स्थानक गर्दी: आपले अपयश केंद्रावर ढकलू नका – फडणवीस

Subscribe

राज्यात कोरोना संकट असून, देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यातच आज अचानक वांद्रे पश्चिम येथील स्थानकाबाहेर मजुरांनी मोठया संख्येने गर्दी केल्याने राज्यातील लॉक डाऊनचा फज्जा उडाला आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. या गर्दीनंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या टीकेला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेच लढावा लागेल, ही पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती असल्याचे यावेळी फडणवीस म्हणालेत.

दरम्यान, वांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. तशी व्यवस्था होत नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही निदर्शनास आणून देत आहोत. तरीही राज्य सरकारने तसे उपाय केलेले नाहीत. आजच्या घटनेतून तरी राज्य सरकारने धडा घ्यायला हवा आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

शेलार म्हणाले, हे लोक एकत्र आले कसे?

एकीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना उत्तर दिल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी “वांद्रे बस डेपोजवळ आलेले सर्व लोक मुंबईतील वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, खार पूर्व आणि इतर भागातील आहेत. प्रश्न हा आहे की, या लोकांना एकत्रित कुणी आणलं? एकत्रित येण्याचा मेसेज नेमका कुणी दिला? याच्यावर सरकारचं लक्ष होतं का? गुप्तचर यंत्रणा कुठे आहेत? या लोकांची खदखद का बघितली गेली नाही? या सर्व गोष्टींवर चर्चा होणं अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी सध्या लोकांनी शांततेने आणि धैर्याने घ्यावं”, असे सांगत दोन ते अडीच तास मोठी गर्दी जमली होती. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिसांकडून सर्वांची समजूत काढली जात होती. त्यांना शांतेतचं आवाहन केलं गेलं. मी स्वत: एक तास त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला”, असे देखील आशिष शेलार यांनी सांगितलं.

दरम्यान, याआधी या गर्दीवरून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. केंद्र सरकार परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी योग्य निर्णय घेत नाही. या कामगारांना सध्या निवारा आणि अन्नाची गरज नसून त्यांना आपल्या गावाला जायचे आहे, अशा आशायचं ट्विट करत आदित्य ठाकरेंनी वांद्र्याच्या गर्दीला केंद्र सरकारला दोषी ठरवले आहे.


वाचा सविस्तर – वांद्रे स्टेशनबाहेर शेकडोंनी परप्रांतीय मजुरांची गर्दी; घरी जाऊ देण्याची मागणी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -