घरमुंबईकिरीट सोमय्यांचा अखेर पत्ता कट; मनोज कोटक यांना उमेदवारी

किरीट सोमय्यांचा अखेर पत्ता कट; मनोज कोटक यांना उमेदवारी

Subscribe

ईशान्य मुंबईतून अखेर किरीट सोमय्यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपने ईशान्य मुंबईमधून नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेला शिंगावर घेणे किरिट सोमय्या यांना महागात पडले आहे. किरीट सोमय्या यांचा पत्ता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कापला आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांना धक्का बसला आहे.

सोमय्यांना डावलत कोटकांना उमेदवारी

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ईशान्य मुंबईचा तिढा अखेर सुटला असून, भाजपाकडून मनोज कोटक यांना या मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करत आता दिल्लीने थेट कोटकांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून ईशान्य मुंबईच्या जागेवरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती. जर किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्या विरोधात काम करू अशी भूमिका शिवसेनेने घेतल्यानंतर अखेर भाजपाने किरीट सोमय्या यांना डावलत थेट कोटक यांना उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

शिवसेनेशी वाद महागात पडला

पालिका निवडणुकीवेळी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर मोठ्याप्रमाणावर टीका केली होती. मुंबई महापालिकेत माफियाराज चालते आणि त्याची सुत्रं वांद्र्यावरुन हालवली जातात असं म्हणत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांनाही लक्ष्य केले होते. त्यामुळे मुलुंडमधील स्थानक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी किरिट सोमय्यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. प्रसंगी त्यांच्या विरोधात काम करण्याची तयारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चालवली होती. भाजपकडून मात्र अखेर पर्यंत सोमय्यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरु होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील सोमय्यांसाठी उध्दव ठाकरेंना गळ घातली होती. परंतु, अखेर शिवसेनेच्या विरोधापुढे भाजपने नमते घेत भाजपकडून किरिट सोमय्यांना डच्चू देत मुंबई महानगर पालिकेतील नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे.

कोटक यांची उमेदवारी भाजपाने जाहीर केली आहे. हा केंद्रीय सांसदीय मंडळाचा निर्णय आहे. यावर राष्ट्रीय अध्यक्ष उत्तर देतील. नुसत्या बातम्यांच्या आधारावर निर्णय होत नसतो. केंद्रीय सांसदीय मंडळ हा उमेदवारीचा निर्णय घेत असते. किरीट सोमय्या यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांचा योग्य आदर होईल.

माधव भांडारी , मुख्य प्रवक्ते, भाजप, महाराष्ट्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -