रस्ते कसे असावेत? मुंबई महापालिकेनी घेतली अनोखी स्पर्धा

street lab competition in mumbai
स्पर्धेतील रस्त्यांचे डिझाईन पाहताना आयुक्त प्रवीणसिंह परदेशी

महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘स्ट्रीट लॅब’च्या माध्यमातून महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ‘रस्ते आरेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आरेखनांचे खुले आणि विनामूल्य प्रदर्शन येत्या सोमवार, मंगळवारी अर्थात २३ आणि २४ डिसेंबर २०१९ रोजी वरळीतील महापालिकेच्या अभियांत्रिकीय संकुल म्हणजेच वरळी हबमध्ये आयोजित करण्यात आले आहे. दोन्ही दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत खुल्या असणाऱ्या या प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट ठरलेली रस्ता आरेखने बघण्याची व ते समजावून घेण्याची सुसंधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तरी या प्रदर्शनास नागरिकांनी, नागरी सुविधांच्या अभ्यासकांनी आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची आरेखने तयार करणे, सुधारित करणे इत्यादी कामे यापूर्वी महापालिकेच्या अंतर्गत स्तरावर करण्यात येत होती. परंतु यंदा प्रथमच रस्ते आरेखनांसाठी खुली स्पर्धा आयोजित करण्यात येऊन संबंधित विषयातील तज्ज्ञांकडून मुंबईतील ५ रस्त्यांची आरेखने प्रवेशिका स्वरुपात आमंत्रित करण्यात आली होती. यामध्ये दक्षिण मुंबईतील ‘लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग’ (नेपियन्सी रोड) राजा राम मोहन रॉय मार्ग आणि मौलाना शौकत अली मार्ग, पूर्व उपगरातील ‘विक्रोळी पार्क साईट मार्ग क्रमांक १७’ आणि पश्चिम उपनगरातील ‘पी दक्षिण’ विभागातील स्वामी विवेकानंद मार्ग (एस.व्ही.रोड) या पाच रस्त्यांच्या तसेच काही रस्त्यांच्या काही भागांचा समावेश आहे.

महापालिकेने आयोजित केलेल्या स्पर्धेत तज्ज्ञ असणाऱ्या ५२ व्यक्ती तसेच संस्थांनी भाग घेतला होता. यापैकी १५ आरेखनांची निवड सादरीकरणासाठी तज्ज्ञांच्या समितीद्वारे करण्यात आली. या सादरीकरणानंतर ५ विजेत्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रसन्न देसाई आर्किटेक्ट, ’स्टुडियो पोमेग्रेनेट’, ’स्टुडियो इनफील ऍण्ड डिजाईन शाळा’, ’मेड इन मुंबई’आणि’वांद्रे कलेक्टीव्ह रिसर्च ऍण्ड डिजाईन फाऊंडेशन’यांचा समावेश आहे. हे विजेते आता मुंबई महापालिका, ब्लूमबर्ग फाऊंडेशन आणि ‘डब्ल्यू.आर.आय. इंडिया’यांच्यासोबत आरेखनांनुसार रस्त्यांबाबत योग्य ते बदल प्रत्यक्षात आणण्याचे कार्य करणार आहेत. मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या रस्ते आरेखनांच्या स्पर्धेत विजेती ठरलेली आरेखने प्रत्यक्ष बघण्याची व त्या आरेखनांची वैशिष्ट्ये थेट तज्ज्ञांकडून समजावून घेण्याची सुसंधी नागरिक व विद्यार्थ्यांसह नागरी सुविधांच्या अभ्यासकांना मिळावी, या प्रमुख उद्देशाने महापालिकेद्वारे या आरेखनांचे दोन दिवसीय विनामूल्य प्रदर्शन वरळी परिसरात आयोजित केले आहे.