घरमुंबईपालिका शाळांमधील मुलींच्या ठेवी अडकल्या; बँकेऐवजी थेट पोस्टात जमा!

पालिका शाळांमधील मुलींच्या ठेवी अडकल्या; बँकेऐवजी थेट पोस्टात जमा!

Subscribe

महापालिका शाळांमधील इयत्ता ८वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनींना देण्यात येणार्‍या रकमेच्या ठेवी कुठे ठेवायच्या याच वादात अडकल्या आहेत. प्रथम बँकांमध्ये ठेवायला निघालेल्या या ठेवी आता चक्क पोस्ट खात्यांमध्ये ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ही रक्कम पंजाब नॅशनल बँकेत ठेवण्याची तयारी करणार्‍या महापालिकेने चक्क ही रक्कम सुरक्षित ठेव म्हणून पोस्ट ऑफिसमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल ७ कोटी ६६ लाखांची रक्कम थेट भारतीय टपाल खात्यात गुंतवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिंनींची पटसंख्या वाढवणे, तसेच शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थिंनींची संख्या कायम राखणे आणि त्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढण्यासाठी महापालिकेने प्रत्येक विद्यार्थिनींसाठी सन २००७-०८मध्ये प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रतिदिन १ रुपया देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यानुसार आता सन २००९-१० पर्यंत ५०० ते २५०० रुपयांची रक्कम विद्यार्थिनींच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.

टपाल खात्याची विश्वासार्हता अधिक

पहिलीपासून इयत्ता ७वीपर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना २५०० रुपये दिले जायचे. परंतु, ही रक्कम १००० रुपये ते ५००० रुपये एवढी करण्यात आली आहे. ही रक्कम राष्ट्रीयिकृत बँकेत गुंतवली जायची. परंतु २०१८-१९मध्ये बँकांकडून स्वारस्य मागवले होते. त्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेसह ३ बँकांनी प्रतिसाद दिला होता. त्यातील पंजाब नॅशनल बँकेची निवड करण्यात आली होती. परंतु शहर आणि उपनगरात एकाचवेळी सारख्या पद्धतीने योजनेची अंमबजावणी होत नाही. त्यामुळे जर एखाद्या विद्यार्थिनीकडे पुराव्यासाठी आधार कार्ड नसेल, तर बँकेत त्या विद्यार्थिनीचे खाते उघडण्यात खूप अडचणी येतात. या ‘केवायसी’साठी पालकांना आणि विद्यार्थिनींना प्रत्येक वेळी पुरावे सादर करावे लागतात. तसेच बँकेसोबत काम करताना मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनाच ही कामे करावी लागतात. त्यामुळे भारतीय टपाल खाते हे भारत सरकारचा उपक्रम असल्याने त्यांची विश्वाससार्हता अधिक आहे. संपूर्ण भारतात त्यांच्या शाखा आहेत. त्यामुळे कुठूनही मुले पैसे काढू शकतात. तसेच संबंधित विद्यार्थिनीचे आधार कार्ड कोणत्याही शुल्काशिवाय पोस्ट खाते काढून देत असल्याने महापालिकेने पंजाब नॅशनल बँकेऐवजी पोस्टात मुदत ठेवी रक्कम भरण्याची तयारी दर्शवली आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या प्राथमिक विभागासाठी इयत्ता ८वीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनींची संख्या १४ हजार ८२ आहे, तर माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींची संख्या २३९९ एवढी आहे. त्यामुळे एकूण १६ हजार ४८१ एवढ्या मुली असून त्यांच्यासाठी एकूण ७ कोटी ६६ लाख ५० हजार रुपये एवढी रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देय आहे. त्यामुळे ही सर्व रक्कम बँकेऐवजी पोस्टात भरती जाणार आहे. बँकेऐवजी पोस्टात रक्कम भरण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -